अरबी समुद्रात घडामोडींना वेग, संभाजीराजे 50 कार्यकर्त्यांसह शिवस्मारकाच्या शोधासाठी बोटीतून निघाले

| Updated on: Oct 06, 2024 | 3:32 PM

संभाजीराजे छत्रपती अरबी समुद्रात स्पीड बोटने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कामकाज पाहण्यासाठी निघाले आहेत. संभाजीराजे यांच्यासह स्वराज्य पक्षाचे 50 पेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. संभाजीराजे अरबी समुद्रात दुर्बीणमधून शिवरायांच्या स्मारकाचा शोध घेत आहेत.

अरबी समुद्रात घडामोडींना वेग, संभाजीराजे 50 कार्यकर्त्यांसह शिवस्मारकाच्या शोधासाठी बोटीतून निघाले
अरबी समुद्रात घडामोडींना वेग, संभाजीराजे 50 कार्यकर्त्यांसह शिवस्मारकाच्या शोधासाठी बोटीतून निघाले
Follow us on

राज्यसभेचे माजी खासदार तथा स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती अखेर अरबी समुद्रातून बोटीने जात आहेत. राज्य सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असा निर्णय 2016 मध्ये घेतला होता. तसेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी जलपूजनाचा कार्यक्रमही पार पडला होता. यानंतर आता छत्रपती संभाजीराजे जलपूजन सोहळा पार पडलेल्या ठिकाणी कामांची पाहणी करण्यासाठी जात आहेत. संभाजीराजे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांना बोटीने जाण्यास परवानगी मिळाली आहे. संभाजीराजे यांना दुर्बीणमधून स्मारकाच्या कामकाजाची पाहणी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार संभाजीराजे दुर्बीणीतून पाहणी करताना दिसत आहेत. पण तरीही त्यांना शिवस्मारक उभे राहणार त्या खडकाच्या परिसरात जायला मिळतं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. महायुती सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. असं असताना आता छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपत अरबी समुद्रातील शिवस्माकरकावरुन आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय 2016 मध्ये घेतला होता. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समुद्रात जलपूजनही झालं होतं. पण पुढे विविध परवानग्यांच्या निमित्ताने या प्रकल्पाचं काम होऊ शकले नाही. याच प्रकल्पावरुन संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. हा प्रकल्प होऊ शकणार नसेल तर तसं सरकारने स्पष्ट करावं आणि या प्रकल्पाचा निधी गड आणि किल्ले यांच्या संवर्धासाठी लावावा, अशी संभाजीराजे यांची मागणी आहे.

सकाळपासून काय-काय घडलं?

संभाजीराजे आपल्या मागण्यांसाठी आज आक्रमक झाले. त्यांनी आज सकाळी पुण्यात अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्यासाठी चलो मुंबई अशी हाक दिली. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पुण्याहून मुंबईत आले. त्यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सज्ज होते. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. संभाजीराजे कार्यकर्त्यांसह गेट वे ऑफ इंडिया इथे आले तेव्हा स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात थोडासा संघर्ष बघायला मिळाला.

पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी संभाजीराजे यांनी आपण पोलिसांसोबत वाद घालायला आलो नाहीत तर समुद्रातील शिवस्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं, हे पाहण्यासाठी आलो आहेत, असं संभाजीराजेंनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांसोबत बातचित केल्यानंतर काही अटीशर्तींसह संभाजीराजे यांना शिवस्मारकाच्या पाहणीसाठी अरबी समुद्रात जाण्यास परवानगी मिळाली. यानंतर संभाजीराजे एका स्पीड बोटमध्ये त्यांच्या चार-पाच कार्यकर्त्यांसह निघाले आणि दुसऱ्या दोन मोठ्या बोटींमध्ये त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पाहणीसाठी निघाले आहेत.