मुंबई: मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनात महिला पोलिसांना धक्का लागल्यानंतर मनसेचे (mns) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी हे गायब झाले होते. मात्र, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर संदीप देशपांडे पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही महिला पोलिसांना धक्का दिला नाही. आमच्या धक्क्याने महिला पोलीस जमिनीवर कोसळल्या नाहीत. महिला पोलिसांना आम्ही धक्का दिल्याचं एक तरी फुटेज दाखवल्यास मी आताच राजकारण सोडून देईन, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. आम्ही पळून गेल्याचं सर्व सांगत होते. आम्ही गायब झालो आहोत असं सांगत होते. आम्ही जर गायब झालो होतो असं म्हणता तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (anil deshmukh) कुठे लपवले होते? अनिल देशमुख तर गृहमंत्री होते. मग आमचीच बदनामी का? असा सवाल देशपांडे यांनी केला.
संदीप देशपांडे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. आमचा धक्का लागल्याचं एक जरी फुटेज दाखवलं तर संदीप देशपांडे राजकारण सोडून देईल, असं सांगतानाच आम्ही दोषी होतो तर त्या महिला पोलिसांना रजेवर का पाठवलं? त्यांना सक्तीची रजा का दिली? त्यांना मीडियासमोर का आणलं नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
आम्ही आघाडी सरकार विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. त्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठी सरकारनं गुन्हे दाखल केले होते. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आज त्यांचं सरकार आहे. त्यामुळे ते वाटेल ते गुन्हे दाखल करत आहेत. उद्या खूनाचा गुन्हाही ते दाखल करतील, असं सांगतानाच आज तुमचं सरकार आहे. जे करायचं ते करा. उद्या आमचीही वेळ येईलच ना? असा इशाराही त्यांनी दिला.
आम्ही पळून गेलो नव्हतो. आम्ही कायदेशीर सल्लामसलत करत होतो. कायद्याने आम्हाला कायदेशीर अधिकार दिला आहे. तो अधिकार आम्ही वापरू नये का?, असा सवाल त्यांनी केला. आतापर्यंत भावना गवळी काय नाही समोर आल्या चौकशीला? अनिल देशमुख किती दिवस लपून होते? ते तर गृहमंत्री होते. प्रताप सरनाईक काय लगेच चौकशीला सामोरे गेले होते का? आम्हाला सल्ले देताना तुम्हाला लाज नाही वाटत? असा सवाल त्यांनी केला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा रद्द केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. आमचे नगरसेवक चोरणारे आम्हाला काय मदत करणार?, असा सवाल त्यांनी केला.