संजय राऊत यांच्या भावाची खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू, चौकशी किती तास? काय आहेत आरोप?

| Updated on: Oct 06, 2023 | 12:12 PM

संजय राऊत यांच्या मागचं शुक्लकाष्ठ काही कमी होताना दिसत नाहीये. संजय राऊत एका प्रकरणात तुरुंगात जाऊन आले होते. आता त्यांचा भाऊ संदीप राऊत हे खिचडी घोटाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू झाली आहे.

संजय राऊत यांच्या भावाची खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू, चौकशी किती तास? काय आहेत आरोप?
Sandeep Raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश थोरात, कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत हे खिचडी घोटाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकसी सुरू झाली आहे. त्यावरून आता राजकारण रंगलं आहे. संजय राऊत यांनी तर खिचडी घोटाळा झालाच नसल्याचा दावा केला आहे. तर संदीप राऊत यांनीही आम्ही कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचा दावा केला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी संदीप राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संदीप राऊत सकाळी 11 वाजेच्या सुमारास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात आले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाल्याचं सांगितलं जातं. ही चौकशी किती तास चालेल याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. राऊत यांना कोणते प्रश्न विचारले जाणार याचीही काहीच माहिती नाही. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी संदीप राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

आम्ही कोणतही चुकीच काम केलेले नाही. घोटाळा केलेला नाही. मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार आहे, असं सांगतानाच ते कोणाच्या मांडीवर जाऊन बसलेत याकडे जनतेचे लक्ष आहे. जनता त्यांना येत्या काळात धडा शिकवेल, असं संदीप राऊत म्हणाले.

नंगे से खुदा भी…

संजय राऊत जेलमध्ये गेले. कुठेही झुकले नाही. त्यामुळे आता कुटुंबीयांना त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे. नंगे से खुदा भी डरता है. आता हेच काम सुरू आहे, असा हल्लाही संदीप राऊत यांनी चढवला.

घोटाळा झालाच नाही

दरम्यान, संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. कोणताही घोटाळा झाला नाही. उलट कोरोना काळात हे सर्व लोक घरी बसलेले असताना आम्ही स्वत: खिचडी वाटप करत होतो. सर्वाधिक खिचडी शिवसेनेने केली. लोकांच्या विझलेल्या चुली पेटवल्या. त्यानंतर उशिराने महापालिका आली. त्यामुळे कुणाच्या तरी सांगण्यावरून कितीही गुन्हे दाखल करा. पोलिसांवर कितीही दबाव टाका. आम्हाला काही फरक पडत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत तुरुंगात जातील

या घोटाळ्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नोटीस बजावली आहे. म्हणजे घोटाळेबाज यांच्या घरचेच आहेत. त्यांची चौकशी केली जाईल, असं सांगतानाच संजय राऊत लवकरच तुरूंगात जातील त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. बाहेर आल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते लवकरच तुरूंगात जातील. नाही तर आम्ही त्यांना तुरुंगात पाठवू, असं संजय शिरसाट म्हणाले.

मग पाटकरने नाव का घेतलं?

यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही खिचडी घोटाळ्यावरून राऊत बंधूंवर टीका केली. खिचडी घोटाळ्याबाबत नोटीस आली असताना राऊत म्हणतो आम्ही खिचडी घोटाळा केला नाही. गोरगरिबांना मोफत खिचडी वाटली. मग सुजित पाटकर आणि तुमचे काय संबंध होते? मग पाटकर तुमच्या भावाचं आणि मुलीचं नाव का घेतोय? असा सवाल नितेश राणे यांनी केला.