मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे सरकारच्या मागे लागलेलं अडचणीचं संकट काही थांबताना दिसत नाही. आधी पूजा चव्हाण प्रकरण थांबतं न थांबतं तोच सचिन वाझे प्रकरणाने ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या. या दोन्ही प्रकरणात विरोधक सत्ताधाऱ्यांवर वरचढ ठरले. तर निर्णय घेण्याचा टायमिंग चुकल्याने ठाकरे सरकारची जनमाणसात प्रतिमा मलिन झाली. कोरोना काळात जे कमावलं होतं, ते या दोन प्रकरणाने ठाकरे सरकारने गमावल्याचं चित्रं आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं? सरकारची कुठं चूक झाली? याचा घेतलेला हा आढावा. (sanjay rathod to sachin vaze, maharashtra government fail to handle this cases?)
कोरोना काळातील कामगिरी
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यात राज्यात कोरोनाचं संकट आलं. कोरोनाचं संकट हे जगासाठी नवीनच होतं. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून नवीनच होते. शिवाय त्यांना प्रशासकीय अनुभव काही नव्हता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका आहे. पालिकेचा डोलारा सांभाळताना मुंबईतील साथ रोग नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या पालिका अधिकाऱ्यांशी बैठका व्हायच्या. या अनुभवाच्या बळावरच ते कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले आणि जगात कुठे कुठे काय केलं जात आहे, याची माहिती घेऊन त्यांनी महाराष्ट्र सावरण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, संचारबंदी, लोकल, एसटी सेवा बंद, गर्दीच्या ठिकाणांमध्ये गर्दीला मज्जाव आदी गोष्टी त्यांनी सक्तीने अंमलात आणल्या. मास्क लावणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी गोष्टींवर त्यांनी भर दिला. त्याशिवाय जागोजागी मोठमोटी कोविड सेंटर्स उभारले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला. ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीवर भर दिला आणि बेरोजगार, हातमजुरी करणाऱ्यांना मोफत अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था… रेशनवर स्वस्तात धान्य आदी गोष्टी ठाकरे सरकारने सुरू केल्या. स्वत: महिन्यातून दोन दोन वेळा लोकांशी संवाद साधून त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील कोरोनाचं भय निर्माण करतानाच त्यांना कोरोनाचं गांभीर्यही दाखवून दिलं होतं. पण पूजा चव्हाण आणि वाझे प्रकरणाने हे सर्व धुळीस मिळाल्याचं चित्रं आहे.
पूजा चव्हाण प्रकरण काय आहे?
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले संजय राठोड यांचं नावही उघड झाले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी हे प्रकरण रोज लावून धरलं. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट राठोड यांचा राजीनामा घ्या, नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला. राजीनामा घेतल्यानंतर तो तीन दिवस राज्यपालांना पाठवलाच नव्हता. त्यावरूनही विरोधकांनी रान उठवलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकारला अखेर राठोड यांचा राजीनामा राज्यपालांना पाठवावा लागला होता.
वाझे प्रकरण काय आहे?
उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित गाडी आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. लवकरच सत्य माहिती समोर येईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारीला सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएच्या हातात आल्यानंतर वाझे यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान वाझे यांनी धक्कादायक माहिती दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना दहा दिवसांची कोठडीही ठोठावण्यात आली.
विरोधकांचा प्रभावी युक्तिवाद
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभेत जोरदारपणे लावून धरले. त्यांनी या प्रकरणात बौद्धिक किस पाडून सरकारला अडचणीत आणले. तर गृहखातं ताब्यात असूनही अनिल देशमुख यांना या प्रकरणात विरोधकांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. फडणवीसांनी पहिल्याच दिवशी मनसुख हिरेन यांचा विधानसभेत कबुली जबाब वाचून दाखवला. दुसऱ्या दिवशी तर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचीही तक्रार वाचून दाखवून वाझे यांनीच माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय असल्याचं विमला यांनी म्हटल्याचं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं. सत्ताधाऱ्यांनी मोहन डेलकर प्रकरणावरून फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फडणवीसांनी डेलकर यांनी सुसाईड नोट सभागृहात फडकावून सत्ताधाऱ्यांचं डेलकर अस्त्रंही निकामी करून टाकलं. (sanjay rathod to sachin vaze, maharashtra government fail to handle this cases?)
ठाकरे… तरीही निर्णय घेण्याचा टायमिंग चुकला
पूजा चव्हाण प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकारचा टायमिंग चुकला. विरोधक ही दोन्ही प्रकरणे लावून धरतील असं ठाकरे सरकारला वाटलं नव्हतं. दोन्ही प्रकरणात पाणी पुलाखालून वाहून गेल्यानंतर ठाकरे सरकारने निर्णय घेतला. पण तोपर्यंत ठाकरे सरकारची प्रतिमा जनमाणसात मलिन झाली होती. जे कोरोनात कमावलं ते त्यांनी या प्रकरणात गमावलं होतं. संकटाला शांतपणे आणि संयमाने सामोरे जाणारे मुख्यमंत्री अशी उद्धव ठाकरे यांनी इमेज तयार केली होती. पण या दोन्ही प्रकरणात त्यांनी आधीच कठोर निर्णय घेतला असता तर कुणाचाही मुलाहिजा न बाळगणारे आणि चुकीच्या गोष्टींना थारा न देणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना प्रतिमा निर्माण करता आली असती, पण ती संधी त्यांनी या दोन्ही प्रकरणात गमावली असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. ठाकरे असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा या दोन्ही प्रकरणात निर्णय घेण्याचा टायमिंग चुकल्याची लोकभावना निर्माण झाल्याचंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर आघाडीचं सरकार असल्याने अनिल देशमुख यांनाही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गृहमंत्री म्हणून हवा तसा ठसा उटविण्यात देशमुख कमी पडल्याचंही राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. (sanjay rathod to sachin vaze, maharashtra government fail to handle this cases?)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/36HEJwXNx1
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 14, 2021
संबंधित बातम्या:
‘सचिन वाझेंना कुणाचा पाठिंबा ते समोर आलं पाहिजे’, फडणवीसांचा इशारा कुणाकडे?
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला
Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा
(sanjay rathod to sachin vaze, maharashtra government fail to handle this cases?)