नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेणा नदीत पोलिसांना 800 आधार कार्ड सापडले. त्यानंतर पोलिसांनी फेकलेले आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणावरुन शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केला आहे. दुसऱ्या राज्यातील मतदार घुसवण्यासाठी हे बोगस आधार कार्ड भाजपच्या आयटी सेलने आणल्याचे राऊत यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीत बोगस आधार कार्डच्या माध्यमातून बोगस मतदान होत आहे. हा भाजपच्या आयटी सेलकडून उपक्रम सुरु आहे. हा प्रकार खूप गंभीर आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाच-दहा हजार अशी बोगस मतदार बनवण्यात आले आहे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. परंतु निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यात अनेक भागांत रोकड सापडत आहे. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आचारसंहिता लागल्याच्या अर्ध्यारात्रीपर्यंत या लोकांनी आपआपल्या उमेदवारांपर्यंत पोलीस बंदोबस्तात पैसे पोहचवले आहेत. त्यांना कोण अडवणार? आता जी रक्कम पकडली जात आहे ती रक्कम त्या तुलनेत किरकोळ आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव ठरलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे की देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचे नाही.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सरळ सरळ भाजपसाठी काम करत होत्या. आमचे फोन टॅपिंग करुन त्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांना देत होते. त्या आज पोलीस महासंचालक आहेत. त्या निष्पक्ष निवडणूक करु शकता का? आम्ही त्यांच्यासंदर्भात तक्रार केली तेव्हा निवडणूक आयोग म्हणतो ते आमच्या हातात नाही. परंतु झारखंडच्या पोलीस महासंचालकांना बदलले जाते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा व्यक्त करु शकतो. आमचे फोन आजही टॅप केले जातात. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी निवड बेकायदेशीर आहे.