मुंबई: आपण लढाईची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे सरकार हतबल झालं आहे. महाराष्ट्र एक झाला आहे हे सांगण्यासाठीच आपण एकत्रं आलो आहोत, असं सांगतानाच आपली आजची विराट शक्ती ही फक्त विराट शक्ती नाही. तर सरकार उलथवून लावण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे, अशी घोषणाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. आझाद मैदानात महामोर्चा पोहोचला असून त्याची सभेत सांगता झाली आहे. या सभेला संबोधित करताना राऊत यांनी ही घोषणा केली.
महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा अपमान आहे. राज्यातील साडे अकरा कोटी लोक हे सरकार कधी उलथवून टाकणार याची वाट पाहत आहे. हा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथवून टाकण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. गावागावात या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत. हे सरकार उलथवून लावण्याची लोक वाट पाहत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आज महाराष्ट्र एका रंगात न्हाऊन निघाला आहे. या मोर्चात शिवसेनेचा झेंडा आहे. राष्ट्रवादीचा झेंडा आहे. काँग्रेसचा झेंडा आहे. डाव्यांचा झेंडा आहे. समाजवादी पार्टीचा झेंडा आहे आणि तिरंगा झेंडाही आहे. आपण एका रंगात न्हाऊन निघालो असून आता आपल्याला समोर दिसणारा रावण गाडायचा आहे, असं ते म्हणाले.
रणनिती ठरली आहे. रणशिंग फुंकले आहे. शंख फुंकले आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली आहे. आता विचारांचे आणि एकतेचे वादळ घोंघावू लागले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आजच्या महामोर्चाला हजारो लोक एकवटले आहेत. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले आहेत. सकाळी 10 वाजता भायखळ्यातून निघालेला हा मोर्चा दुपारी 1 वाजता आझाद मैदानात पोहोचला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे इतर नेते यावेळी उपस्थित आहेत. या मोर्चाला रश्मी ठाकरेही उपस्थित राहिल्या आहेत.