निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : संभाजी नगर जिल्ह्यातील किराडपुरा भागात काल दोन गटात राडा झाला. या राड्यात एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे. सध्या संभाजी नगरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या राड्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. येत्या 2 तारखेला संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा होऊ नये म्हणूच संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात आला आहे, असा आरोप करतानाच संभाजीनगरसह देशात ज्या दंगली झाल्या त्या भाजप पुरस्कृत होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
संभाजी नगरात दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे संभाजीनगरात मोठी दंगल झाली नाही. येत्या 2 एप्रिलला रोजी महाविकास आघाडीची संभाजीनगरात सभा आहे. ती होऊ नये, कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली सभा होऊ नये. त्यासाठी कारस्थान सुरू आहे. काल मुंबईतही मालवणीतही दोन गटात तणाव झाला. यापूर्वी रामनवमी होत होती. गुढी पाडवा होत होता. पण खेड, मालेगावमध्ये आमच्या सभेला लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे. ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण नसताना जातीय धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
राज्यात दंगली घडवल्या जात आहे. दंगली घडवणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. पण काहीही केलं तरी आमची सभा होणारच. महाविकास आघाडीचे नेते या सभेला हजर राहतीलच. राज्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्वच दिसत नाही. गृहमंत्र्यांचं अस्तित्व फक्त विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्याइतपत आहे. तेही सध्या मुख्यमंत्रीच देत आहेत. जे विरोधी पक्षाचे लोक आहेत, आजही त्यांच्यावर खोट्या कारवाया करणं, जुनी प्रकरणं काढून गुन्हे दाखल करणं सुरू आहे. या राज्यात असं कधी झालं नव्हतं. पण लक्षात ठेवा डाव उलटा पडला तर उद्या आम्ही सत्तेवर येऊ. तेव्हा तुम्हाला याची उत्तरं द्यावी लागतील. खासकरून पोलिसांना, असा इशारा राऊत यांनी दिला.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा इश्यू आहे. पोलीस आणि गृहखात्याचं अस्तित्वच नाही. संभाजीनगरात विनाकारण दंगल झाली. कारण महाविकास आघाडीची रॅली होणार आहे. या रॅलीला महाविकास आघाडीचे सर्व नेते असणार आहेत. लाखो लोक या सभेला येणार आहेत. त्यामुळे दंगल घडवली. ही सरकार पुरस्कृत दंगल आहे. मुंबईतही दंगल होत आहे. हिंदू-मुस्लिम करून वाद घडवले जातील. देशाची शांतता भंग करतील. पण संभाजी नगरात रॅली होणारच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे. तिथे दंगल झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात दंगल झाली नाही. तेव्हाही रामनवमी होतीच ना. तुमच्याच राज्यात दंगल का होते? कारण तुम्ही काही लोकांना दंगलीसाठी स्पॉन्सर्ड करत आहात. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. त्यांना शांतता नको आहे. उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांना भविष्य दिसतंय. म्हणून त्यांची शेवटची धडपड सुरू आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.