मुंबई | 22 जुलै 2023 : मणिपूरच्या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसवण्यात महिलांचा मोठा हात होता. महिलांनीच त्यांचा प्रचार केला. आता महिलाच या सरकारला घरी पाठवतील. देशातील महिलांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत. त्यांना मणिपूरच्या घटनेची प्रचंड चीड आलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
महिला सरकार बदलवून टाकेल हे जे ममता बॅनर्जी म्हणत आहेत ते मला पटतंय. आमच्याकडेही फिडबॅक येतोय. देशातील महिला प्रचंड रागात आहेत. त्यांना वेदना झाल्या आहेत. मणिपूरची घटना असो, कुस्तीपटू महिलांचं प्रकरण असो की देशातील इतर घटना असो, या सर्व प्रकरणात केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घतेली आहे. त्यामुळे देशातील महिलांनी हे सरकार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींचं सरकार आलं तेव्हा सर्वाधिक प्रचार महिलांनी केला होता. मोदींचं सरकार आणण्यात महिलांचं योगदान मोठं आहे. आता याच महिला सरकारला घरी पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले.
मणिपूर फाईल कुणी दाखवो, न दाखवो. मणिपूरमध्ये काय घडतंय हे संपूर्ण जग पाहत आहे. मणिपूरमध्ये अशा शेकडो घटना घडल्या आहेत. आर्मीवर हल्ला होत आहे. सरकार केवळ पाहत आहे. मणिपूरची हालत काश्मीरपेक्षा भयंकर झाली आहे. काश्मीरमध्ये हिंदू-मुसलमान आणि भार- पाकिस्तान केलं जातं. ते मणिपूरमध्ये त्यांना करता येत नाही. मणिपूरमधून राजकीय फायदा होत नसल्याने भाजप शांत आहे. या ठिकाणी जर एखादा मुस्लिम व्यक्ती असता तर आतापर्यंत देशात कहर झाला असता, असं हल्लाच राऊत यांनी चढवला आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या घटनेवर भाष्य करण्याचं आवाहन केलं आहे. देशात महिला राष्ट्रपती आहे, असं असूनही महिलांची नग्न परेड केली जाते. तरीही राष्ट्रपतींनी त्यावर अजून भाष्य केलं नाही. त्यांनी सरकारला आदेशही दिले नाहीत, असं ते म्हणाले.
मणिपूरमध्ये मे महिन्यात दोन महिलांची जमावाने नग्न धिंड काढली होती. त्यानंतर शेतात नेऊन या दोन्ही महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दोन महिन्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांना अटक केली आहे. या चौघांची कसून विचारपूस सुरू आहे. त्यांच्याकडून अजून काही लोकांची नावे समजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.