बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीवर खासदार संजय राऊत यांनी आसूड ओढला. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि बंदुक परवाने, खंडणी, राजकीय गुन्हेगारीवरून त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळेच बीड जिल्ह्यात अर्बन नक्षलवाद फोफावल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या अर्बन नक्षलवादाचे म्होरके असल्याचा आरोप त्यांनी केला. एकूणच या मुद्यावरून ते आक्रमक दिसले.
फडणवीस अर्बन नक्षलवाद्याचे कमांडर
बंदुकीच्या जोरावर धनंजय मुंडेंनी बीडमध्ये ११८ मतदान केंद्रावर मतदान होऊ दिलं नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात. मतदान रोखलं जातं ते अर्बन नक्षलवादच आहे. परळीत मतदान होऊ दिलं नाही. फ़़डणवीस हे अर्बन नक्षलवाद्याचे कमांडर आहात. तुम्ही नेते आहात. अर्बन नक्षलवाद कुणी पोसला असेल तर तो फडणवीस आणि भाजपने, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
बीड, ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा
कल्याणमध्ये खासदार कोण आहे असा सवाल करत त्यांनी त्याच जिल्ह्यात रेप, हत्या होत आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघातच हत्या, रेप, धमकी, खंडणी होत आहे. ठाण्यात कायदा सुव्यवस्था नाही, बीडमध्येही तेच आहे, असा आरोप केला.
बीडमध्ये ३८ हत्या झाल्या. फडणवीस स्वत:ला लाडका भाऊ म्हणतात. देवाभाऊ म्हणतात. तुमच्या जिल्ह्यात ३८ हत्या झाल्या. त्या विधावा लाडक्या बहिणी नाही का. तुम्हाला काही माहीत नाही. नैतिकतेच्या आधारे तुम्हाला काही वाटत असेल तर त्या मंत्र्याला हटवा. आम्ही सर्वजण २९ तारखेला न्यायासाठी मोर्चा काढणार आहोत. उद्धव ठाकरे बीड आणि परभणीत जाणार आहोत. आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. महाराष्ट्राची स्थिती अशी झाली की युनायटेड नेशनची ह्युमन राईटच्या विंगला या प्रकरणात लक्ष घालायला लावली पाहिजे, इतकी भयानक परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.
तुम्ही तर गुन्हा पचवला असता
आम्हाला अर्बन नक्षलावादी म्हणता. बीडमध्ये कोण आहे. ३८ हत्या करणारा सूत्रधार मंत्री तुमच्या मतदारसंघात आहे. कोठेवाडीला कशासाठी पर्यटन करत होता. तुम्ही या आधी पर्यटनच केली. तुम्ही विरोधी पक्षावर दबाव आणू नका. विरोधी पक्षाने संतोष देशमुख आणि सूर्यवंशीच्या खुनाला वाचा फोडली नसती तर फडणवीस तुमच्या गृहखात्याने हा गुन्हा पचवला असता, असा घणाघात त्यांनी घातला.
अजितदादा, मुंडे यांचा राजीनामा घ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा धनंजय मुंडे यांना आशीर्वाद आहे. मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतला पाहिजे. फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेने घेतला पाहिजे. नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवार यांचाही राजीनामा घ्यावा. . त्यांनी मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं आहे. मी हे हिंमतीने सांगतोय. मला त्याची किंमत मोजावी लागेल, असे राऊत म्हणाले.