‘आता त्यांना कळेल की अटक करुन किती मोठी चूक केली’, संजय राऊतांचा इशारा

| Updated on: Nov 09, 2022 | 11:25 PM

"देशाची राजकारणातील सर्वात मोठी चूक असेल की संजय राऊतांना अटक केली", अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला.

‘आता त्यांना कळेल की अटक करुन किती मोठी चूक केली’, संजय राऊतांचा इशारा
Follow us on

मुंबई : “आता त्यांना कळेल की मला अटक करुन किती मोठी चूक केली. देशाची राजकारणातील सर्वात मोठी चूक असेल की संजय राऊतांना अटक केली. आज न्यायालयाने सांगितलं की, संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. हे न्यायालयाने सांगितल्यावर ते हायकोर्टात पळत गेले. पण पळू द्या. मला किती वेळाही अटक करा. मी शिवसेनेपासून दूर जाणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलोय”, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत कडाडले. संजय राऊत त्यांच्या भांडूप येथील घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

संजय राऊत यांचं भाषण जसच्या तसं :

मी नक्कीच घरी आलोय ना? मला वाटलं शिवतीर्थावर आलोय, दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की, शंभर दिवसांनंतरही तुम्ही माझं स्मरण ठेवलं. माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालाय.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे आज महाराष्ट्र आणि देशाने पाहिलं. याच रस्त्यावरुन मला अटक करुन घेऊन गेले होते. तेव्हाही तुम्ही जमला होता. तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गेल्या तीन महिन्यात तोडण्याचा, फोडण्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण ती तुटलेली नाही.

हे अभद्य शिवसेना आहे. ही बुलंद शिवसेना आहे. ते अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलंय. मशाल फडकलेली आहे आणि एकच शिवसेना महाराष्ट्रात राहील ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना.

आता त्यांना कळेल की मला अटक करुन किती मोठी चूक केली. देशाची राजकारणातील सर्वात मोठी चूक असेल की संजय राऊतांना अटक केली. आज न्यायालयाने सांगितलं की, संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. हे न्यायालयाने सांगितल्यावर ते हायकोर्टात पळत गेले. पण पळू द्या. मला किती वेळाही अटक करा. मी शिवसेनेपासून दूर जाणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलोय.

आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो सरकार आएँगी हमारी! हे मला माहिती होतं.

आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही.

मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही.

आज मी आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे.

जेलमधून सुटल्यावर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. माझ्याशी बोलले. यावेळी त्यांचा उर भरुन आला. मलाही भरुन आलं. शिवसेना हा परिवार आहे. रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबून मला अभिवादन करत नव्हते तर शिवसेनेला अभिवादन करत होते.

आम्ही मोहम्मद अली रोडवरुन जात होतो. मुस्लीम समाज खाली उतरुन शिवसेनेच्या नावाने जयजयकार करत होता.

माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?

मला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोरी पेडणेकरांना त्रास देत आहेत. काल भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारे यांच्यावर काहीतरी चालू आहे. करु द्या.

तुम्ही जे स्वागत केलंय ते या भगव्याचं आहे. मी आर्थर रोड जेलमध्ये काम करत होतो ते पक्षाचंच काम करत होतो. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण पक्षासाठीच जाणार. मला चिरडणं, संपवणं सोपं नाही. हे बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेलं रसायन आहे.

आता रडायचं नाही, आता लढाई सुरु झालीय. आता संपायचं नाही. 103 दिवस तुरुंगात राहीलो. 103 आमदार निवडून येणार. प्रत्येक संकट ही संधी आहे. मी शंभर दिवस तुरुंगात राहीलो. मला माहिती होतं की प्रत्येक कार्यकर्ते माझी वाट पाहत आहेत. हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळू शकतं.

ज्याने शिवसेना फोडली, तोडली, आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेनेचा नाव गोठवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सर्वांच्या छातडावर बसून शिवसेनेचं तेच तेज आणि वैभव, ताकद आकाशाला गवसणी घालणारी असेल. माझ्या अटकेने सुरुवात झालीय. आता सुटलोय. सुसाट सुटायचं आहे.