माझ्यावर हल्ला करण्याचा कट, सीमा प्रश्नासाठी 70वा हुतात्मा व्हायलाही तयार; संजय राऊत यांनी ललकारले
राज्यपाल सुटकेचा मार्ग शोधत आहेत, असं वाटतं. शिवसेना आणि महाविकास आघाडीने बंदचे संकेत दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची नाचक्की होऊ शकते.
संजय राऊत यांनी ललकारले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on
मुंबई: कर्नाटकामध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कर्नाटक कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्स नंतर संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला काय तुरुंगात टाकायचं ते टाका. मी घाबरणार नाही. सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने या आधी 69 हुतात्मे दिले आहेत. मी 70 वा हुतात्मा व्हायला तयार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला ललकारले आहे. तसेच आपल्यावर हल्ला करण्याचं यामागे कारस्थान असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील, असं मी त्या भाषणात म्हणालो होतो. त्यात प्रक्षोभक काय ते कळलं नाही. 2018च्या भाषणाची दखल घेऊन त्यांनी कोर्टात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ मी कोर्टात जावं. मग कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा. ही माझी माहिती आहे. किंवा मला अटक करावी आणि मला बेळगावच्या तुरुंगात टाकावं अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हे सुद्धा वाचा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेलं वक्तव्य चार दिवसांपूर्वीचं आहे. सोलापूर, सांगलीच्या भागांवर त्यांनी दावा सांगितला आहे. त्यांनीच विषयाला तोंड फोडलं. आमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना बेळगावात बोलावून हल्ला करण्याचं कारस्थान आहे. हे कारस्थान शिजताना दिसतं आहे. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी, असं राऊत म्हणाले.
राऊत काय म्हणाले…
शिवसेना लढण्यासाठी तयार आहेच. शिवसेनेने सीमा प्रश्नासाठी 69 हुतात्मे दिलेत. मी 70-वा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेबांनी सीमा प्रश्नासाठी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे. शिवसैनिकांनी तीन दिवस मुंबई पेटवली होती. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असतील तर मी नक्कीच जाईल. मी लपून छपून जाणार नाही. कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिक जाऊ आणि बेळगावच्या न्यायालयात स्वत:ला अटक करून घेऊ.
किती दिवस तुरुंगात ठेवायचं ठेवा. सीमा प्रश्नासाठीची जबाबदारी शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना दिली आहे. त्यांनी या समन्सची दखल घेतली पाहिजे. पक्ष म्हणून नाही. राजकीय वाद बाजूला ठेवा. महाराष्ट्र म्हणून पाहा. ते आपली कोंडी करत आहेत. महाराष्ट्राविषयी बोलणारे सीमाप्रश्नावर बोलणाऱ्यांना अडकवू इच्छितात. वॉरंट आला असला तरी आम्ही लढत राहू.
मी या विषयावर उद्धव ठाकरेंशी बोलेन. महाराष्ट्र सरकारने त्यात हस्तक्षेप करावा. कारण ही सीमाभागाची लढाई आहे. पण राज्य सरकारने या विषयावर मिळमिळीत भूमिका घेतली आहे. बोम्बई बोलले, त्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर नाही. प्रतिहल्ला नाही. फडणवीस यांनी उत्तर दिलं. पण त्यात दम नाही. म्हणूनच जे लढणारे आहेत. ज्यांच्यात दम आहे. त्यांना वॉरंट बजावलं आहे. पण शिवसेना घाबरणार नाही. शिवसेना डरपोक नाही.
30 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची सुनावणी आहे. त्या आधी बोम्मई जत आणि सोलापूरवर हक्क सांगतात. त्याच वेळेला बेळगाव आणि कारवारमध्ये कँम्पेन सुरू करतात. मराठी लोकांना धमकावतात. त्यांच्या हाकेला कोण धावून येईल तर शिवसेनाच हे त्यांना माहीत आहे. म्हणून आमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. अटकेची भीती दाखवली जात आहे. भाजपच्या भाषेत सांगायचं तर ही क्रोनोलॉजी समजून घ्या. ही एक क्रोनॉलॉजी आहे. ही क्रोनोलॉजी सर्वच राजकीय पक्षांशी समजून घेतली पाहिजे.
यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपाल सुटकेचा मार्ग शोधत आहेत, असं वाटतं. शिवसेना आणि महाविकास आघाडीने बंदचे संकेत दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची नाचक्की होऊ शकते. उदयनराजे भोसले यांच्या भावना तीव्र आहेत. संभाजी राजेंच्या भावना तीव्र आहेत. मराठा संघटनांच्या भावना तीव्र आहेत. महाराष्ट्र खवळून उठल्यावर राज्यपाल इतके दिवस राहिलेच कसे? भाजप त्यांचा बचाव कसा काय करू शकतो? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.