भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आज माझगांव कोर्टात सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे स्वत: आपले भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यासोबत कोर्टात हजर झाले होते. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील सुनावणीसाठी उपस्थित होते. यावेळी कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने याआधी राऊतांना 15 दिवासांची कोठडी सुनावली होती. पण ती शिक्षा देखील आता कोर्टाकडून स्थगित करण्यात आली आहे. खरंतर संबंधित प्रकरणावर कोर्टात काल सुनावणी होणार होती. पण काही कारणास्तव ती आज झाली. संजय राऊत स्वत: या सुनावणीला उपस्थित होते. या प्रकरणात 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 31 जानेवारी 2025 ला होणार आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात दंडाधिकारी कोर्टाने दोषी ठरवत राऊतांना 15 दिवसांची कोठडी आणि 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता. याच प्रकरणी संजय राऊत यांच्या अपील अर्जावर आज माझगांव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. संजय राऊत यांना झालेल्या 15 दिवसांच्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दंडाधिकारी कोर्टाने दिलेली 30 दिवसांची मुद्दत संपणार होती. त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अपीलावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली.
संजय राऊत हे काल स्वतः कोर्टात उपस्थित नव्हते. हा मुद्दा उपस्थित करत मेधा सोमेय्या यांच्या वकिलानी अपील याचिकेला विरोध केला होता. विशेष म्हणजे कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असं कोर्टाने संजय राऊतांना काल खडेबोल सुनावले होते. जामीन अर्जच्या सुनावणी वेळी अपीलकर्ता हे स्वतः हजर राहणे गरजेचं, असा युक्तिवाद मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी काल केला होता. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली.