मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची तोंड भरून स्तुती केली आहे. राऊत यांनी पहिल्यांदाच ट्विट करून अजित पवार यांची तोंडभरून स्तुती केली आहे. त्याला कारणही तसंच आहे. अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली. त्यामुळे राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांची स्तुती केली आहे. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश!, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी अजित पवार यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत अजित पवार भाषण करताना दिसत आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सर्व पडले की नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले. दुसऱ्यांदा वांद्रे की कुठे तरी पाडले. हां… तिथे पडले. तिथे तर महिलेने पाडलं… हां… बाईनं पाडलं… बाईनं… ही त्यांची… प्रत्येकाची काय परिस्थिती आहे…, असं अजित पवार बोलताना दिसत आहेत.
दादा म्हणजे कमाल आहे.
कमाल की चीज!
नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा!
सहज सोप्या भाषेत थेट संदेश!
जय महाराष्ट्र! https://t.co/DnjCD4lCZl— Sanjay Raut (@rautsanjay61) February 24, 2023
दरम्यान, संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. राज्यात निर्माण झालेल्या कटुतेवर राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी विधान केलं होतं. कटुता वाढली, असं फडणवीस म्हणाले होते. कटुता संपली पाहिजे, असंही ते म्हणाले होते. मी म्हटलं होतं तुम्ही पुढाकार घ्या, असं राऊत म्हणाले. कटुता ढवळण्याचं काम करतंय कोण? कटुता ढवळण्याचं काम भाजपनेच केलं. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले, हल्ले केले, शिवसेना तोडली. त्यामागे भाजपच आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ज्या प्रकारच्या भाषेचा भाजप करत आहे त्यातून कटुता वाढत आहे. महाराष्ट्रातून शिवसेना संपणार नाही. शिवसेनेला मोडून काढता येणार नाही. कटुता आम्हालाही संपवायची आहे. व्यक्तीगत संबंध आहेत. पण राजकीय संबंधात कटुता आहेच, असंही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मताशी राऊत यांनी सहमती दर्शवली. मध्यावधीच्या शक्यतेत तथ्य आहे, असं ते म्हणाले.