मुंबई: शिवसेनेची (shivsena) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषद होणार आहे. मी स्वत:च जाहीर केलं आहे. त्यामुळे तुम्ही थोडी वाट पाहा. आमचीही पत्रकार परिषद पाहा. या, ऐका. कधी तरी शिवसेनेचं ऐका. सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. मात्र, दुपारी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांच्या आरोपावर विचारलं असता अरे सोड रे ते… असं म्हणत त्यांनी सोमय्यांच्या प्रश्नावर बोलण्यास टाळलं. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राऊत हे अत्यंत गर्भित इशारे देत आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते काय पोलखोल करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित ठिकाणांवर आज छापेमारी सुरू आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या रेड संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केलं पाहिजे. दाऊदवर काही बोलू नये. काही कारवाई सुरू असेल तर राज्य आणि केंद्राने एकत्रित कामे केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
दाऊदच्या ठिकाणावर रेड सुरू असून त्यात काही राजकीय नेत्यांची नावं येत आहेत. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर नावं समोर येतील की नावं घुसली जातील हा एक प्रश्नचिन्ह आहे. छत्तीसगड ते पश्चिम बंगालपर्यंत तेच सुरू आहे. मी त्यावर बोलणार नाही. राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो, असंही त्यांनी सांगितलं.
कोणत्याही राजकीय पक्षासाठी यंत्रणा नाही. गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. हा देशातील सर्वात मोठा बँक फ्रॉड आहे. आता ईडी तिथे काय करते ते पाहायचं आहे. तिथे ईडी का जात नाही? दोन वर्षापासून हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? घोटाळा दाबण्यासाठी कुणीकुणी प्रयत्न केले? आरोपी कसे पळाले? हा संशोधनाचा विषय आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
संजय राऊतांचं ट्विट व्हायरल, आज होणार पत्रकार परिषद; ते साडेतीन लोक कोण ?
श्रद्धेचा बाजार मांडला; नाशिकमध्ये पुरोहितांमध्ये वाद, पूजेसाठी आलेले यजमान पळवले…!