तब्बल 4 तास खलबतं, अखेर महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलं?

| Updated on: Mar 06, 2024 | 5:07 PM

महाविकास आघाडीची आज मुंबईतील हॉटेल फोर सिझन्स येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिीती होती. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर हे देखील या बैठकीला आले. ही बैठक जवळपास चार तास चालली.

तब्बल 4 तास खलबतं, अखेर महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलं?
Follow us on

मुंबई | 6 मार्च 2024 : महाविकास आघाडीची आज मुंबईच्या हॉटेल फोर सिझन्समध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चारही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जवळपास चार तास चर्चा झाली. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. संजय राऊत यांनी यावेळी चारही पक्षाच्या नेत्यांमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली.

“महाविकास आघाडीची जागावाटप संदर्भात आणि पुढली रणनीती संदर्भात आज बैठक पार पडली. आजच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, मी स्वत: होतो. मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. चार पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये उत्तम चर्चा झाली. चर्चा अतिशय सकारात्मक झाली. जागावाटपात कोणतेही मदभेद नाहीत. एकाही जागेवर मतभेद नाहीत”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

‘प्रकाश आंबेडकर यांचं एका गोष्टीचं पूर्ण समाधान की…’

“प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या जागेचा प्रस्ताव दिला आहे. त्या जागांवर चर्चा झाली. आमच्याबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष आमच्यासोबत असावा, अशी आमची भूमिका आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढणार असं निश्चित केलं आहे. सर्व गोष्टी जवळपास निश्चित झाल्या आहेत. जागावाटपाविषयी आम्ही एकत्र बसून घोषणा करु. प्रकाश आंबेडकर यांचं एका गोष्टीचं पूर्ण समाधान आहे की, मोदींची हुकूमशाही उलथून टाकायची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे याबाबत त्यांचं आणि आमचं एकमत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

महाविकास आघाडीचं 39 जागांवर एकमत-सूत्र

महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राज्यातील 48 पैकी 39 जागांवर सर्व नेत्यांचं एकमत झालं आहे. काही जागांचा तिढा अजूनही कायम आहे. पण हा तिढा लवकरच सोडवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीत आपला प्रस्ताव ठेवला. ते बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी आजच्या बैठकीत काहीच निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया दिली. उद्या पुन्हा बैठक होईल, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. तर सूत्रांनी प्रकाश आंबेडकर यांचयासोबत मविआ नेत्यांची येत्या 9 मार्चला पुन्हा बैठक होईल अशी माहिती दिलीय. या बैठकांमधून अंतिम निर्णय काय होतो ते पाहणं मत्त्वाचं ठरणार आहे.