गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आज आहे. आमचे निष्ठावंत शिवसैनिकच बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाईल. ते कधी राम बनले? ते विभिषण आहेत. विभिषण आपल्या स्वार्थासाठी जेव्हा आला होता तेव्हा प्रभू रामाने त्याचा वापर केला आणि नंतर त्यांना सोडून दिले. त्यांना काय माहीत राम काय आहे? या लोकांना अयोध्या आम्ही पहिल्यांदा दाखविली. उद्धवजी यांच्या नेतृत्वात ते आयोध्येत गेले. आता मुख्यमंत्रीपदावर जोपर्यंत आहेत, तोपर्यंत बीजेपीचे पोपट म्हणून बोलत राहतील, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या राड्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाळासाहेब सर्वांचे आहे. त्यांच्या स्मृती स्थळावर सर्वांनी यावं. अनेक लोक येत असतात. पण काल आलेल्यांनी नौटंकी केली. त्यांना आम्ही शिवसैनिक मानणार नाही. त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल श्रद्धा नाही. भाव नाही. ते फक्त नौटंकी करण्यासाठी आले होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तुम्ही नौटंकी करता. नौटंकी करणाऱ्याला विरोध झाला. कारण खरा शिवसैनिक अशी नौटंकी खपवून घेणार नाही. खऱ्या शिवसैनिकांनी नौटंकी करणाऱ्यांना त्याने विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे. कुणी काही बोलू द्या. आजचा दिवस पवित्र आणि गंभीर आहे. पण कालचा प्रकार काही लोकांनी केला. निष्ठावंत सैनिकांनी गद्दारांना प्रतिकार केला. हा ट्रेलर आहे. 2024ची तयारी आहे. काल जे आले होते त्यांनी दहा वेळा पक्ष सोडलेला आहे. ते काय निष्ठा शिकवणार?, असा सवाल राऊत यांनी केला.
श्रद्धा आणि भाव असता तर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईच्या दारात गुलामी केली नसती. सोडून द्या. काल जे झालं ते ट्रेलर आहे. आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक विधानही त्यांनी केलं. संत तुकडोजी महाराजांच एक अभंग आहे. मनी नाही भाव, देवा मला पाव. देव बाजारचा भाजी पाला नाही रे… तसं यांचं आहे. तुमच्या मनात श्रद्धा नाही, भाव नाही आणि तुम्ही स्मृती स्थळावर येऊन नौटंकी केली, अशी टीकाही त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे हे देशातल्या समाजकारणातलं महान व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर स्वाभिमानाने ताठपणा करून असलेला माणूस आपल्याला दिसला नसता. बाळासाहेब ठाकरे नसते तर जी हिंदुत्वाला जाग आलेली आहे, ज्या राष्ट्रवादीची बात राज्यकर्ते करत आहेत, ती त्यांना कधीच करता आली नसती. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र अखंड ठेवला. आमच्यासारखे असंख्य लोक जे समाजकारणामध्ये काम करत आहेत ते त्यांच्यामुळेच. आम्ही दिल्लीत गेलो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमुळेच, असं ते म्हणाले.