जिंकेल त्याची जागा हाच फॉर्म्युला वापरा, पुण्याच्या जागेवरून संजय राऊत यांचं ट्विट; राष्ट्रवादीच्या सुरात सूर

| Updated on: May 29, 2023 | 10:22 AM

गेल्या अनेक वर्षापासून पुणे काँग्रेसच लढवत आहे. सुरेस कलमाडी सातत्याने विजयी व्हायचे. काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळा झाल्यानंतर ती सीट आम्ही गमावली.

जिंकेल त्याची जागा हाच फॉर्म्युला वापरा, पुण्याच्या जागेवरून संजय राऊत यांचं ट्विट; राष्ट्रवादीच्या सुरात सूर
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. पुण्यात आमची सर्वात जास्त ताकद आहे. त्यामुळे पुण्याची जागा आम्हाला सोडली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांच्या या मागणीला काँग्रेसने केराची टोपली दाखवली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा आमचा पारंपारिक बालेकिल्ला असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. आता या वादात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या वादात उडी घेतली आहे. राऊत यांनी एक ट्विट करत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळला आहे, तर काँग्रेसला डिवचण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा, हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोटनिवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल!, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटमधून काँग्रेसला एकप्रकारे त्याग करण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते त्यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

अजित पवार यांचं म्हणणं काय?

अजित पवार यांनी काल पुण्यात बोलताना पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. पुणे लोकसभा मतदारसंघात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. आमची ताकद आहे. त्यामुळे जो पक्ष जिथे बळकट असेल त्याला तिथे लढण्याची संधी दिली पाहिजे, असं अजितदादा म्हणाले होते.

शरद पवार काय म्हणाले?

निवडणूक होते की नाही ते पाहू. होत असेल तर आम्ही तिघे बसून पुण्याबाबत चर्चा करू. दावे सर्वच पक्ष करणार. सर्वच म्हणणार आम्हालाच मतदारसंघ हवा. पण शेवटी कोण प्रामाणिकपणे लढू शकतो आणि विजय संपादन करू शकतो हे पाहावं लागेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते.

वडेट्टीवार काय म्हणाले?

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यास नकार दिला. गेल्या अनेक वर्षापासून पुणे काँग्रेसच लढवत आहे. सुरेस कलमाडी सातत्याने विजयी व्हायचे. काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळा झाल्यानंतर ती सीट आम्ही गमावली. असं असलं तरी पुणे काँग्रेसच लढवणार आहे. कसबा मिळाल्यानंतर आम्ही 34 वर्षानंतर तिथे विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची पुण्यात ताकद नाही, असं कसं म्हणता येईल? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.