तुम्ही रामलल्लावर टॅक्स लावलाय का? निवडणूक आयोग जिवंत असेल तर कारवाई करा : संजय राऊत

| Updated on: Nov 14, 2023 | 11:36 AM

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आम्ही इंडिया अलायन्सचे नेते एकत्र बसू आणि किरकोळ तक्रारी दूर करू. विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी झाल्या आहेत. पण इंडिया अलायन्सची निर्मिती ही लोकसभेसाठी करण्यात आली आहे हे मी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुकीनंतर सर्व त्रुटी दूर केल्या जातील, असं ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी बोलत होते.

तुम्ही रामलल्लावर टॅक्स लावलाय का? निवडणूक आयोग जिवंत असेल तर कारवाई करा : संजय राऊत
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील एका प्रचार सभेत भाजपला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवून आणतो, असं आश्वासन दिलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. तुम्ही रामलल्लावर टॅक्स लावला आहे काय? रामलल्लाचा सातबारा तुमच्या नावावर घेतला आहे काय? असं सांगतानाच निवडणूक आयोग जिवंत असेल तर आयोगाने भाजपवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही मागणी केली आहे. अमित शाह यांचं विधान मी ऐकलं.मध्यप्रदेशात भाजपचं सरकार बनलं तर मध्यप्रदेशातील जनतेला फ्रि मध्ये अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन देऊ, अशी घोषणा त्यांनी एका प्रचार सभेत केली. हे फ्रि, ते फ्रि.. आता रामलल्लाही फ्रि का? रामलल्ला देश आणि सर्व जगाचा आहे. समजा, मध्यप्रदेशातील लोकांनी भाजपला पराभूत केलं आणि उद्या ते लोक दर्शनाला गेले तर त्यांना दर्शन घेऊन देणार नाही का? हे कोणतं राजकारण सुरू आहे? रामल्लावर तुम्ही टॅक्स लावला. औरंगजेबाच्या काळात धार्मिक कार्यावर जिझिया कर लावला जायचा. तुम्ही ही रामलल्लावर कर लावला का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

एजंट म्हणून नियुक्त केलंय का?

भाजपने माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारची स्टेटमेंट केली जात आहे. तुम्ही रामलल्लाचे मालक आहात की रामलल्लाने तुम्हाला एजंट म्हणून नियुक्त केलंय? ही गंभीर गोष्ट आहे. निवडणूक आयोग जर जिवंत असेल तर त्यांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

तर श्रीरामही या भूमीतून पळून जाईल

मध्यप्रदेशात भाजपचा दारूण पराभव होताना दिसत आहे. भाजपचे सर्व केंद्रीय नेते उतरले आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्रीही उतरले आहेत. रामलल्लाचा सातबारा भाजपच्या नावावर केलेला नाही. तुम्ही मालक नाही. माफी मागा. तुम्ही मत दिलं तर रामलल्ला दर्शन देईल. नाही दिलं तर आम्ही दर्शन देऊ देणार नाही. मत न देणाऱ्यांना अयोध्येच्या वेशीवरून बाहेर पाठवणार का? हे चुकीचं आहे. हिंदू संघटनांनी याची दखल घेतली पाहिजे. या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात श्रीराम आहे. श्रीरामाची मालकी तुम्हाला कुणी दिली नाही. तुम्ही मालकी सांगितली तर श्रीरामही या भूमीतून पळून जाईल, असं ते म्हणाले.

भाजपने कधीच सामावून घेतलं नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पाच राज्यात भाजपचा प्रचार करणार आहे. त्यावरूनही त्यांनी हल्ला चढवला. भाजपचा प्रचार करू द्या. ते शिवसेनेचे पुढारी असते, कार्यकर्ते असते तर ते भाजपच्या प्रचाराला गेले नसते. बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कधी भाजपच्या प्रचाराला गेले नव्हते. आम्ही आमच्या प्रचाराला गेलो होतो. भले आम्हाला यश मिळालं नसेल. आम्ही अनेक राज्यात निवडणुका लढवल्या आणि आमचाच प्रचार केला. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती असताना आम्ही महाराष्ट्रात एकत्र प्रचार केला. पण भाजपने आम्हाला महाराष्ट्राबाहेर कधीच सामावून घेतलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.