Sanjay Raut : प्रकाश आंबेडकर- मुख्यमंत्री शिंदे यांची गुप्त भेट, संजय राऊत यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले; छुपं काय…

| Updated on: Jan 12, 2023 | 11:04 AM

गांधी-नेहरु घराण्यातील एक तरुण हजारो किलोमीटर पायी चालत आहे. देशात सद्भावना निर्माण करण्यासाठी ते जात आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या घराण्यातील हा तरुण आहे.

Sanjay Raut : प्रकाश आंबेडकर- मुख्यमंत्री शिंदे यांची गुप्त भेट, संजय राऊत यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले; छुपं काय...
प्रकाश आंबेडकर- मुख्यमंत्री शिंदे यांची गुप्त भेट, संजय राऊत यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले; छुपं काय...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मध्यरात्री वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये अडीच तास खलबतं झाली. शिंदे गटासोबत युती करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मध्यरात्री झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे-आंबेडकर भेटीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यात छुपं काय असतं? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांना मीडियाने प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतचा प्रश्न विचारला. त्यावेळी राऊत यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. छुपं काही नव्हतं. मी दिल्लीत होतो. प्रकाश आंबेडकर यांची माझीही भेट झाली. त्यात छुपं काय? प्रकाश आंबेडकर शिंदे भेटले त्यात छुपं काय? तुम्हाला भेटीबाबत कळलं म्हणजे छुपं काय? तुम्हाला त्या भेटीची माहिती मिळाली, याचाच अर्थ ती भेट गुप्त नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचं सांगितलं. मीही भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे. जम्मूमधून मी या यात्रेत सामील होईल. ही यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा मला यात्रेत जाता आलं नव्हतं. पण आदित्य ठाकरे यात्रेत सामील झाले होते. आता मीही सामील होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

गांधी-नेहरु घराण्यातील एक तरुण हजारो किलोमीटर पायी चालत आहे. देशात सद्भावना निर्माण करण्यासाठी ते जात आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या घराण्यातील हा तरुण आहे. त्याचं स्वागत देशाच्या पंतप्रधानांनीही केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. पंतप्रधान आपलेच आहेत. ते नेहमी येतील. पण गुंतवणूक परत परत येणार नाही. त्यामुळे सरकारने दावोसचा दौरा केला पाहिजे. पंतप्रधानांचा दौरा मुंबई दौरा रद्द केला पाहिजे, असं सांगतानाच केवळ महापालिका निवडणुकीसाठीच पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.