मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल स्पष्ट केलं. राऊत यांनी आज आपल्या या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे नॅनो सरकार आहे. हे सरकार पडणार आहे. पडद्यामागे काय हालचाली चालल्यात हे त्यांना माहीत आहे का? असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे.
हे नॅनो सरकार आहे. नॅनो गोष्टी फार टिकत नाही. नॅनो कारचा कारखाना बंद झाला आहे. अशा फॅक्टऱ्या अधिक टिकत नाहीत. नॅनो हा शब्द फडणवीसांनी दिला म्हणून वारंवार वापरतो. त्यांनी हा शब्द वापरून चूक केली. मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो आहे. हे सरकार पडणार हे मी सांगतो तेव्हा त्यात तथ्य असतं. पडद्यामागे काय चाललं हे त्यांना माहीत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे मोठे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. इतके वर्ष ते काम करत आहेत. ते कुणाच्या बुद्धीने चालत नाहीत. मी पवारांचं नेतृत्व मानतो. ठाकरे हे सेनापती आहेत. सेनापती आदेश देतात ते आम्ही मानायचे असतो. बावनकुळे यांनी शरद पवारांवर बोलू नये. मोदीही पवारांना गुरु मानतात हे बावनकुळेंना माहीत नाही. बावनकुळे फक्त फडफडत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांनी केलं असतं तर त्यांची बुद्धी नॅनो आहे, असं म्हणता आलं असतं. फडणवीस प्रगल्भ राजकारणी. त्यांनी विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ काम केलं. त्यांना कालचा विराट मोर्चा दिसला नसेल, त्यांनी अनुभवला नसेल तर हे त्यांचं दुर्देव आहे, असा टोला त्यांनी लगावला.
कालचा मोर्चा नॅनो आहे, अपयशी आहे, फेल आहे. अशी भूमिका त्यांनी घेतली असेल तर मधल्या काळात फडणवीस दिल्लीत गेले होते. तिकडे दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं इजेक्शन दिलेलं दिसतंय. ती गुंगी त्यांची उतरलेली नसल्याचं दिसतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
निदान फडणवीस यांनी तरी मोर्चाचं स्वागत करायला हवं होतं. त्यांनी मोर्चाला सामोरे जायला हवं होतं. कालचा मोर्चा सरकार विरोधी नव्हता. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कालचा मोर्चा होता. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या शक्ती महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्राचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अपमान केला. त्याविरोधात महाराष्ट्राची शक्ती एकवटली होती. अशावेळी कालचा मोर्चा दिसला नाही. त्यांच्या डोळ्यात बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे महाराष्ट्र द्वेषाचा वडस आला आहे. इतका पराकोटीचा महाराष्ट्र द्वेष राज्यकर्त्यांमध्ये आम्ही गेल्या 70 वर्षात पाहिला नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.