मुंबई: बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असून भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. (sanjay raut reaction on maharashtra ekikaran samiti defeat in karnataka municipal election)
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.
मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही.कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले.
बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल आज महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राचंया इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा झाला नाही. मराठी माणसाच्या बाबतीत आतापर्यंत गद्दारी कोणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना वेदना आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. मराठी माणूस हरल्याबद्दल त्यांच्यात अस्वस्थता आहे. तुम्ही पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आशिष शेलार यांच्यावरही टीका केली. तुमचा भगवा झेंडा होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा कर्नाटक सरकारने उतरवला तेव्हा तुमचं बोळकं का बसलं होतं? मराठी तरुणांवर गुन्हे दाखल केले जातात, त्यावेळी गप्प कसे बसता? असा सवाल करतानाच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन एकीकरण समितीच्याच मागे होते. कारण ती मराठी माणसाची प्रातिनिधीक समिती आहे, असं ते म्हणाले.
बेळगाव महापालिकेत प्रचारासाठी शिवसेना नेते का गेले नाही? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. आम्ही मुद्दाम गेलो नाही प्रचाराला. कारण या निवडणुकीला वेगळं वळण लागू नये म्हणून आम्ही गेलो नाही. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही तिथे गेलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 6 September 2021https://t.co/AwWbqQL4k1#SuperFastNews #SuperFastNews100 #100SuperFastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2021
संबंधित बातम्या:
Belgaum Municipal Election Results 2021 Live : बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत
गणेशोत्सवानिमित्त भक्तांमध्ये मोठा उत्साह, नवी मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या
Maharashtra News LIVE Update | बेळगावात मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटताना लाज वाटत नाही? : संजय राऊत