निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने वांद्रे येथील बीकेसी मैदानावर भाजप आणि शिंदे गटाने त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला दीड लाख लोक येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. या लोकार्पणाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगच फुंकणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याला अवघे काही तास बाकी असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. पंतप्रधान मोदी उद्या शिवसेनेने केलेल्या कामांवरच शिक्कामोर्तब करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान ज्या कामांचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत, त्यातील बरीचशी कामे शिवसेनेने सुरू केली होती. शिवसेनेने केलेल्या कामाच्या पायभरणीचं लोकापर्ण होणार आहे. याचा अर्थ आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे, असा चिमटाही खासदार संजय राऊत यांनी भाजपला काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेहमीच स्वागत आहे. मोदी ज्या योजनांच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्या कामाची सुरुवात आम्ही केली. शिवसेनेने जी कामे केली, त्याचं लोकार्पण होत आहे. पंतप्रधानांनी यावं. मुंबई, महाराष्ट्र आणि हा देश सर्वांचा आहे, असं राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंत तोडण्यात येणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मागच्यावेळी विद्यापीठात अशाच प्रकारची घाण आणि गोंधळ करून ठेवला होता.
पंतप्रधानांची सुरक्षा ही सर्वोच्च आहे. त्याविषयी शंका असण्याचं कारण नाही. त्यांनी यावं. त्यांचं स्वागत करतो. मुंबई हे सुरक्षित स्थळ आहे. सुरक्षेच्या काही समस्या असतील तर त्यांचा कार्यक्रम दुसऱ्या जागेत ठेवता आला असता, असं त्यांनी सांगितलं.
डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. डॉक्टर पळून गेले म्हणण्यापेक्षा डॉक्टरांची कमतरता होती असं मला म्हणायचं होतं. कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता होती. तरीही उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नियंत्रणात ठेवला. यात डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्राचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही.
डॉक्टरांचा तुटवडा होता हे सांगितले. डॉक्टर हे पांढऱ्या कपड्यातील देवदूत होते. त्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केलं. त्यांना आमचा सलामच आहे. माझा डॉक्टरांना दुखावण्याचा प्रयत्न नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.