गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : उद्धव ठाकरे गट आणि समाजवादी नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे. मात्र, ठाकरे गट आणि समाजवाद्यांच्या या युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. हे मिलावट राम आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मिलावट मिलावट काय करता? तुमची तर भाजपमध्ये सडलेली भेळपुरी झालीय, असा घणाघाती हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या तरी माहीत आहे काय? असा खोचक सवालही राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहीत आहे काय हे विचारा. समाजवादाची व्याख्या विचारा. डेफिनेशन ऑफ सोशालिझम त्यांना विचारा. एकनाथ शिंदे शिवसेनेत होते. स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे पाईक म्हणतात, त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे काय संबंध होते हे विचारा जरा. जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, एसएम जोशी आणि नाना गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एकमेकांवर टीका टिप्पण्या जरूर केल्या. पण महाराष्ट्राच्या हितासाठी समाजवादी पक्षाचे अनेक नेते आणि बाळासाहेब एकत्र आले. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, मग सीमा प्रश्नाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांमध्ये प्रजा सोशॅलिस्ट पार्टी आणि शिवसेना एकत्र आली होती, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना विचारा बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव ऐकलंय का? नानासाहेब गोरे माहीत आहेत काय? एसएम जोशी आणि मधू दंडवतेंचं नाव ऐकलंय का? विचारा मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात तिथे सर्वाधिक समाजवादी लोक राहत होते. शिंदे ज्या आरएसएससोबत आहेत, त्या आरएसएससारखे समाजवादी लोक डबल ढोलकी नाहीत. त्यांनी जात आणि धर्माच्या नावावर देशाला तोडलं नाही, असंही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे ज्या भाजपाच्या पदराखाली बसले आहेत. त्या भाजपला प्रथम सत्ता देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते समाजवाद्यांनी केलं. जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस आणि चंद्रशेखर यांनी भाजपला सत्ता दिली. आधी समाजवाद समजून घ्या. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कधी समाजवाद्यांनी केली नाही. ती संघाने केली. तुम्ही संघासोबत आहात. तेव्हा तुम्ही शांतपणे बसा.
विधीमंडळाच्या ग्रंथालयात जा. जुने रेकॉर्ड तपासा. निष्कलंक चारित्र्याचे समाजवादी नेते महाराष्ट्रात होते. निळू फुले, बाबा आमटे श्रीराम लागू यांच्याशी आमचे मतभेद झाले. पण त्यांचे महाराष्ट्र प्रेम आणि राष्ट्रभक्ती यावर शंका घेता येणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
महापालिकेचा रेकॉर्ड तपासा. महापालिकेचा कारभार मराठीत व्हावा यासाठीचा पहिला प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस यांनी आणला. हा इतिहास आहे. तो पुसला जाणार नाही. तुम्ही कसली म्हणताय मिलावट? तुमची भेळपुरी झालीय सडलेली. तुम्ही आम्हाला काय सांगता हिंदुत्व? समाजवाद? पंडित नेहरूंनी या देशात समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सार्वजनिक उपक्रमातून नोकऱ्या दिल्या. तुमचे भाजप आणि संघ हे सर्व विकून खात आहेत. तुम्हीही त्यात भागीदार आहात. एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.
गुजरातमध्ये क्रिकेट सामने व्हावेत. पण पाक टीमवर ज्या पद्धतीने फुले उधळली. असं कधी इतर राज्यात झालं नाही. शिंदे आणि त्यांचे 40 आमदार ज्या पक्षाचे जोडे पुसत आहेत त्यांनी अहमदाबादमध्ये पाकच्या संघावर फुलांचा वर्षाव केला. जणू काही योद्धे आले. आमच्या जवानांच्या हत्या पाकिस्तान करत आहेत. हेच इतर राज्यात झालं असतं तर थयथयाट केला असता. पण शिंदे कौतुक करत आहेत. काय तर म्हणे खेळात धर्म आणू नये. गल्लत करू नका. जरा बाळासाहेबांचे विचार समजून घ्या, असा टोलाच त्यांनी हाणला.