निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : संजय राऊत यांचा भोंगा पहाटे पहाटे वाजत असतो. ते आपल्याला घाबरतात म्हणून रोज यांची टीका सुरू असते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी फडणवीस यांच्यासमोर एका डीलची ऑफर दिली आहे. मी तुमच्या घरासमोर येऊन प्रतिक्रिया देतो. त्यानंतर तुम्हीही त्यावर उत्तर द्या. नाही तर तुमची कारस्थानं थांबवा. मी सकाळी सकाळी बोलण्याचं बंद करतो. आहे का डील मंजूर? अशी ऑफरच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिली. त्यामुळे आता फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही ऑफर दिली आहे. तुमच्या सागर बंगल्यावर मी 9 वाजता पीसी घेईल. तुम्ही साडेनऊला बोला. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. माझ्या पक्षाचा मी प्रवक्ता आहे. सामनाचा कार्यकारी संपादक आहे. मी खासदार आहे. माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा मला अधिकार आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? याचा अर्थ ते आम्हाला घाबरत आहेत. शिवसेना कागदावर तोडली असेल. निवडणूक आोयगाच्या माध्यमातून तुम्ही कुणाला शिवसेना दिली असली तरी खरी शिवसेना इथे आहे. जमीनीवर आहे. आमच्यात आहे. तुम्ही आमच्याशी सामना करू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
आमची एवढी भीती वाटते. आम्ही बोलू नये वाटत असेल तर बेकायदेशीर कृत्य थांबवा. कायद्याने राज्य करा. लांड्यालबाड्या करून तुम्ही विरोधी पक्षांना त्रास देत असाल तर आम्ही बोलू. तुम्ही तुमची कारस्थानं थांबवा आम्ही तुमच्यावरचे हल्ले थांबवू. सरळ डील आहे. स्वीकारता का विचारा त्यांना? असा सवाल त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमूठ सभेवरही टीका केली होती. त्यावरूनही त्यांनी फडणवीस यांना सुनावले आहे. ही त्यांच्या मनातील भीती आहे म्हणून वारंवार ते वज्रमूठ सभेवर बोलत आहेत. मी आज नागपूर ला चाललो आहे.. सभा होणार, असंही राऊत म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. विरोधी पक्षांचं ऐक्य कधीच होणार नाही हा भ्रम विरोधकांचा आहे तो तुटून पडेल. 2024मध्ये सत्ता परिवर्तन निश्चित होणार आहे. त्याची ही सुरूवात आहे, असा दावाही त्यांनी केला.
नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे चेहरा असतील का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर निर्णय झाला नाही. चर्चा झाली नाही. नितीश कुमार चेहरा असतील किंवा नसतील हे येणारा काळ ठरवेल. चेहऱ्यावर काही मतभेद होणार नाहीत. त्यावर नंतर चर्चा होईल. पण एकत्र येऊन सत्ता परिवर्तन करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.