मुंबई : मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रिपब्लिक टीव्हीवर निशाणा साधला आहे (Sanjay Raut Republic TV and Arnab Goswami over TRP racket). संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी या टीआरपी रॅकेटच्या पत्रकार परिषदेची माहिती देताना रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचा आरोप केला. तसेच असत्यमेव जयते असं म्हणत रिपब्लिक टीव्हीवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, “मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन टीआरपी वाढवल्याची माहिती दिली आहे. असत्यमेव जयते.” मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात त्यांनी बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत असल्याची माहिती दिली. या माध्यमातून ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाल्याचंही त्यांनी नमूद मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नमूद केलं.
Mumbai police commissioner held a press conference just now saying interalia that Republic TV purchased TRPs
असत्यमेव जयते!!!— Sanjay Raut (@rautsanjay61) October 8, 2020
“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी हंसा कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. या कर्मचाऱ्याकडे 20 लाख रुपयांची रोकड आणि बँकेत साडेआठ लाख रुपये आढळून आले होते. या कर्मचाऱ्याने पोलिसांना या रॅकेटविषयी माहिती दिली. सध्या पोलिसांकडून या सर्वांचा शोध घेतला जात आहे.
टीआरपीत कशाप्रकारे व्हायचे फेरफार?
बीएआरसी BARC या संस्थेकडून टीआरपी मोजला जातो. यासाठी देशभरात जवळपास 30 हजार बॅरोमीटर्स लावण्यात आले आहेत. यापैकी दोन हजार बॅरोमीटर्स हे एकट्या मुंबईत आहेत. हे बॅरोमीटर्स कुठे लावलेत, याची माहिती गोपनीय असायची. हंसा या कंपनीला या बॅरोमीटर्सची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून टीआरपीमध्ये फेरफार करण्याचे रॅकेट चालवण्यात येत होते. हे कर्मचारी विशिष्ट चॅनेल्सना टीआरपीसंबंधी गोपनीय माहिती देत असत, असे परमबीर सिंह यांनी सांगितले.
याशिवाय, एखाद्या चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना दिवसभर आपल्या टीव्हीवर संबंधित चॅनेल सुरु ठेवण्यास सांगितले जाई. यासाठी लोकांना पैसे दिले जात असत. संबंधित चॅनेल सतत सुरु राहिल्याने त्याचा टीआरपी वाढण्यास मदत होत असे, असेही परमबीर सिंह यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक
Sanjay Raut Republic TV and Arnab Goswami over TRP racket