मुंबई : येत्या 2024मध्ये महाविकास एकत्र निवडणूक लढणार की नाही हे मी आताच कसं सांगू? असं विधान करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी राहणार आहे. आघाडी तुटणार नाही की फुटणार नाही. आम्ही 2024मध्ये एकत्र निवडणूक लढणार आहोत. नाही तर मग आघाडीच्या सभा कशासाठी घेतल्या असत्या? असा सवाल करतानाच शरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केला आहे.
शरद पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढत असता. महाविकास आघाडी मजबूत आहे. एकत्र रॅली सुरू आहे. मग रॅली कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी घेतोय. 1 मे रोजी आम्ही ऐतिहासिक रॅली घेत आहोत. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. आघाडीच्या या उभारणीत शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही सर्व आहोत. उद्धव ठाकरे आहेत. राहुल गांधी आहेत. पण शरद पवार यांचं महत्त्व आहे आणि ते राहणार, असं संजय राऊत म्हणाले.
आपण तिघे एकत्र राहिलो तर 2024मध्ये आपण भाजपचा पराभव करू आणि लोकसभा निवडणूक मोठ्या संख्येने जिंकू ही पवारांची भूमिका आहे. महाविकास आघाडीबाबत तुम्ही म्हणताय तशी त्यांची भूमिका असेल असं वाटत नाही. कारण आम्ही सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतो. आताच थोड्यावेळापूर्वी शरद पवार यांच्याशी बोललो. त्यांच्या बोलण्यातून आघाडी नसावी किंवा तुटावी असं वाटत नाही, असं राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीची मशाल विझेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही तुम्हाला पूर्णपणे खाक करू. ही मशाल न विझणारी आहे. ही अमर ज्योत आहे. ती अशीच तेवत राहील. तुम्ही तुमचीच चिंता करा. मोदी यांचा एकेरी उल्लेख कोणी करत नाही. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांचा आदर आहे.
पण ते भाजपचे नेते किंवा हुकूमशाह सारखे वागतात तेव्हा त्यांच्यावर टीका केली जाईल. हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत हा आदराचा विषय असला पाहिजे. ते चुकीचे असले तरी आम्ही बोलू. पण त्यांच्या चुकांबद्दल बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकणार असाल तर नक्कीच त्यांच्यावर आम्हाला बोलावं लागेल. त्यासाठी बावनकुळे यांची परवानगी घेण्याची गरज नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.
काही लोक सकाळी नशा करून बोलतात या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली. आमची नशा शुद्ध आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलत आहात. ही भांग अत्यंत वाईट. तुमच्या आसपास नशेबाज कोण आहेत हे मला बोलायला लावू नका. उद्धव ठकारे यांच्या सभा, माझं बोलणं आणि महाविकास आघाडीची तुम्हाला भीती वाटत आहे, असा पलटवार त्यांनी केला.
राज्यातील सरकार जास्त दिवस राहणार नाही. भाजपलाच सरकार नकोय. जितके दिवस सत्तेत राहतील तितकं भाजपचं नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री बदलणं म्हणजे सरकार जाणं असंच आहे. मी जे म्हणतोय त्याची माहिती घ्या. मंत्रालयात मंत्री जात नाहीत. काय चाललंय तुम्ही फडणवीसांना विचारा काय होतंय ते, असंही ते म्हणाले.