भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा कॅसिनो खेळतोय? संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे खळबळ

| Updated on: Nov 20, 2023 | 2:44 PM

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्टाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदुत्ववादी नेत्याने 3.50 कोटींचा जुगार खेळल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यांच्या या ट्विटवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित फोटोवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा कॅसिनो खेळतोय? संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे खळबळ
Follow us on

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. संजय राऊत यांनी एका कॅसिनोमधील फोटो ट्विट केलाय. या फोटोमधील व्यक्तीने एका रात्रीत 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा संजय राऊतांनी केलाय. “हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. त्यांच्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोत जुगार खेळणारी व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. त्यानंतर भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलीय.

“आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?”, असा सवाल करत भाजपने संजय राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे.

मोहित कंबोज यांची संजय राऊतांवर टीका

दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊतांनी आज खालच्या दर्जाची कृती केली आहे. त्यांची मानसिकता खराब झाली. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. संजय राऊत यांना माझी विनंती आहे, माझे जे 25 लाख रुपये आपल्याकडे आहेत, ते आजपर्यंत तुम्हाला मला परत दिले नाहीत. पण एका चांगल्या डॉक्टराकडे जावून तुम्ही उपचार घ्या. तुम्ही माझे जुने मित्र आहेत. तुम्ही अशा आजाराने त्रस्त आहात ज्यावर उपचार करण्याची नितांत गरज आहे”, अशी टीका मोहित कंबोज यांनी केली.