मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नांदेड येथील भाजपच्या महामेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारून त्याची उत्तरे देण्याचं आव्हानच दिलं आहे. शाह यांनी कालच्या भाषणातून सर्वाधिक टीका उद्धव ठाकरे यांच्यावरच केली. शाह यांच्या या भाषणाची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है, असं म्हणत राऊत यांनी शाह यांना डिवचले आहे. तर शाह यांचं भाषण मजेशीर आहे, असं सांगत राऊत यांनी त्यांच्या भाषणाची खिल्लीही उडवली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करून अमित शाह यांच्या भाषणाची खिल्ली उडवतानाच भाजपवर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन. अमित भाई यांच्या भाषणातील 20 मिनिटात 7 मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम, असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिला. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.
गृह मंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे.मला प्रश्न पडला आहे.हे भाजपा चे महा संपर्क अभियान होते की.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन..अमित भाई यांच्या भाषणातील२० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही… https://t.co/zYCTJllLDV
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 11, 2023
कालपासून भाजपचा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने नांदेडमध्ये महासंपर्क मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला अमित शाह उपस्थित होते. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या भाषणातून शाह यांनी उद्धव ठाकरे यांना चार प्रश्नही विचारले. उद्धवजी, सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. दोन बोटीत पाय ठेवता येत नाही, असं सांगतानाच तिहेरी तलाक, राम मंदिर, यूसीसी आणि मुस्लिम आरक्षणावर तुमचे धोरण जनतेसमोर स्पष्ट करा, तुमची गुपिते आपोआप उघड होतील, असं आव्हानच अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.