Sanjay Raut : जणू काही 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले होते, संजय राऊत यांची जोरदार टीका

| Updated on: Jun 19, 2024 | 8:26 PM

"४०० पार करणार होते. २०० केले म्हणून आभार मानता. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला बहुतेक. मोदी ब्रँड होता. ब्रँडी झाली आहे बहुतेक. देशी ब्रँडी झाली आहे. या नशेत ते असं काही करत आहे. तुम्हाला नाकारलंय, लाथाडलंय आणि आभार मानताय?", असा घणाघात संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut : जणू काही 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले होते, संजय राऊत यांची जोरदार टीका
संजय राऊत
Follow us on

शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिवस आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. “४०० पार करायला निघाले होते. जणू काही ४०० हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. ते जन्माला आल्यावर ४०० खुळखुळे घेऊन आले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना पराभूत केलं. आम्हाला कुणी हरवू शकत नाही”, अशी टीका संजय राऊतांनी केली. “ते डोममध्ये डोमकावळे जमले होते. आमचा ५८ वा वाढदिवस आहे. त्यांचा अडीचवा वाढदिवस आहे. शिवसेना प्रमुखांना वेळ जात नव्हती म्हणून शिवसेना स्थापन केली नाही”, अशी टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर केला.

“गुजरातचे सोमे गोमे हवशेगवशे आले आणि शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कुणी पाहू नये. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मी यासाठी म्हणतोय कारण छत्रपतींनी आपली मान दिल्लीच्या तख्तासमोर झुकवली नाही. त्याच महाराष्ट्राचा वारसा बाळासाहेबांनी चालवला. भाजप आता आभार यात्रा काढणार आहे. कशासाठी महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. मोदींना बहुमत मुक्त केल्यामुळे. ४०० पार करणार होते. २०० केले म्हणून आभार मानता. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला बहुतेक. मोदी ब्रँड होता. ब्रँडी झाली आहे बहुतेक. देशी ब्रँडी झाली आहे. या नशेत ते असं काही करत आहे. तुम्हाला नाकारलंय, लाथाडलंय आणि आभार मानताय?”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

‘महाराष्ट्राने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला’

“रामाचा फोटो छोटा अयोध्येत. मोदींचाच फोटो मोठा. मी टीव्हीवर पाहिलं. आता मोदींना राम दिसला असता रामाने लाथ घातल्याने, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला. कारण त्यांचं हिंदुत्व नकली होतं. त्यांना सट्टा लागला. पण हा शेवटचा आकडा आहे. हा सट्टाबाजार नेहमी तात्पुरता असतो. कधी कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आणि महाराष्ट्रातही कोसळणार. कसला स्ट्राईक रेट. स्ट्राईक रेट तुमच्या बेईमानीचा वाढला आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली.