अजितदादा, शिंदे गटासह संजय राऊत यांचा ‘या’ नेत्यावर जोरदार हल्ला; शरद पवार यांच्या फोटोच्या निमित्ताने साधला निशाणा

| Updated on: Aug 17, 2023 | 10:10 AM

शरद पवार अजून आहेत. ते सक्रिय आहेत. त्यांची कार्यकारिणी आहे. पक्षाचा संस्थापक तिथे आहे. त्याची मालकी इतरांना दिली जाते. हे या देशात असं कधी घडलं नव्हतं. संसदीय लोकशाही आणि निवडणूक आयोगाची आम्हाला चिंता आहे.

अजितदादा, शिंदे गटासह संजय राऊत यांचा या नेत्यावर जोरदार हल्ला; शरद पवार यांच्या फोटोच्या निमित्ताने साधला निशाणा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो अजितदादा गटाकडून सर्रासपणे वापरला जात आहे. त्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. पवार यांनी आपला फोटो लावू नका, नाहीतर मी कोर्टात जाईन, असा इशाराच अजितदादा गटाला दिला आहे. त्यावर पवार आमचे गुरू आहेत. आम्ही त्यांचे फोटो लावणारच, असं अजितदादा गटाने म्हटलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जुंपण्याची शक्यता आहे. आता या वादात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. शरद पवार यांना दैवत म्हणता आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसता. हे ढोंग आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे सांगत असतानाच राऊत यांनी एका बड्या नेत्यावर नाव न घेता टीका केली आहे.

शरद पवार यांनी त्यांचा फोटो लावण्यास अजितदादा गटाला मज्जाव केला आहे. त्यासंदर्भाने बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना फुटीचा दाखला दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना फोटो न लावण्यास सांगितलं होतं. त्याचा दाखला देत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत कुणाला तरी इशारा दिला होता. माझा फोटो वापरू नका. तुम्ही माझ्यापासून दूर गेला. माझा विचार तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही दूर गेला ना, मग माझा फोटो वापरू नका, असं बाळासाहेब म्हणाले होते, असं सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

हे सुद्धा वाचा

डरपोक लोकांचे

आज शरद पवार यांच्यापासून लोक फुटून गेले. तरीही म्हणतात शरद पवार आमचे नेते आहेत. शरद पवार आमचे गुरू आहेत. हे ढोंग आहे. तुम्ही स्वत:चा पक्ष स्थापन करा. तुम्ही तुमचे फोट लावून मते मागा. तुम्हाला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे का हवेत? तुमच्यात धमक नाही का?, असा सवाल त्यांनी अजितदादा आणि शिंदे गटाला केला. शरद पवार आमचे दैवत आहेत, असं हे लोक म्हणत आहेत. मग दैवताच्या पाठीत खंजीर का खुपसला? बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही का फोडली? डरपोक लोकांचे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

निवडणूक आयोगाचा गैरवापर

बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी उद्धव ठाकरे असताना तुम्ही शिंदे सारख्या ऐरागैऱ्यांना देता. हा कोणता कायदा आहे? शरद पवार आहेत. त्यांचा पक्ष आहे. ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही त्यांचा पक्ष इतरांना देत आहात. हे या देशात होत आहे. निवडणूक आयोगाचा गैरवापर होत आहे. सर्व यंत्रणांचा गैरवापर होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

सर्व ईडी ठरवतेय

शरद पवार म्हणाले, कोण कोणत्या पक्षात जावं हे ईडी ठरवत आहे. कोण मंत्री बनावं आणि कोणी काय बनावं हे ईडी ठरवत असते. त्यामुळे देश चिंतीत आहे. काल शरद पवार यांनी परखड भाष्य केलं. त्यांनी व्यक्त केल्या भावना या शिवसेनेच्याच नाही तर देशवासियांच्या भावना आहेत. जे शिवसेनेच्या बाबतीत फुटीनंतर घडलं ते राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आहे. शरद पवार यांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. तरीही शरद पवार यांना वाटतं की शिवसेनेच्या फुटलेल्या मॉडलप्रमाणे घडेल आणि माझा पक्ष फुटीर गटाला दिला जाईल, अशी चिंता राऊत यांनी व्यक्त केली.