राज्याला मुख्यमंत्री नाही, मख्खमंत्री आहेत; संजय राऊत यांची खोचक टीका

| Updated on: Mar 17, 2023 | 11:08 AM

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मख्खमंत्री असा केला आहे. राज्याला मुख्यमंत्रीच नाही. सर्व कारभार मख्खपणे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचा कारभार पाहत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राज्याला मुख्यमंत्री नाही, मख्खमंत्री आहेत; संजय राऊत यांची खोचक टीका
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. राज्याला मुख्यमंत्रीच नाही. राज्याला फक्त मख्खमंत्री आहेत. सर्व कारभार मख्खपणे सुरू आहे. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यात फरक आहे. राज्याला मुख्यमंत्री असते तर राज्यात जे काही चाललं आहे ते चाललं नसतं. मुख्यमंत्री फक्त 40 खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली.

संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं. राहुल कुलचं 500 कोटीचं प्रकरण मी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. त्यावर ते बोलत नाहीत. कारण राहुल कुल हे फडणवीसांचे खासमखास आहेत. 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे. हे ब्लॅकमेलिंग आहे का? कुलला कोण वाचवत आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहुल कुलला वाचवत आहेत. आहे हिंमत त्यावर बोलण्याची? इकडे तिकडे टेप वाजवत आहात. आधी आसपास काय चाललं पाहा. मग महाविकास आघाडीवर बोटं घालत बसा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

आघाडीच्या एकत्र सभा होणार

सरकार म्हणजे कोण? राज्यात सरकारच नाही. त्यामुळे गदारोळ माजला आहे. लाल वादळ येऊन ठेपलं आहे. ठाणे जिल्ह्यातून बाहेर पडलं आहे. अराजकाची ठिणगी पडली तर राज्यात वणवा पेटेल हे त्यांना माहीत आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्र खतम करण्याचं काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होतील. त्यानंतर उद्धव ठकारे यांच्या शिवसेनेच्याही सेपरेट सभा होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

नाकाने कांदे सोलत आहेत

यावेळी त्यांनी विरोधकांवर होणाऱ्या कारवायांवरूनही टीका केली. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. खरे सुत्रधार तेच आहेत, राज्य तेच चालवतात. केंद्रातील सरकार विरोधकांना तुरुंगात टाकतात. देवेंद्रजींनी राज्याची खदखद समजून घेतली पाहिजे. राज्यातील अस्थिरता समजून घ्यावी. आमदार खासदारांना धमक्या येत आहेत. ब्लॅकमेलिंग त्याच्या डोळ्यासमोर आहेत आणि पुन्हा नाकाने कांदे सोलायचे? फडणवीसांचे हात दगडाखाली आहेत, अशी टीका त्यांनी केली.