मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राज्यात संतापाचं वातावरण पसरलं आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्याने ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनी तर थेट बोम्मई यांना इशारा दिला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही. धमकी देतोय. तुमची बकबक बंद करा. हे घेऊ, ते घेऊ हे थांबवा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं सरकार जरी सिलिंडरवर करून गुडघ्यावर बसलं असलं तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे या महाराष्ट्रात हे विसरू नका, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
40 आमदारांचा गट आहे ना. स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी शिवसेनेतून बाहेर पडत आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं ना. आता कुठे आहे तुमचा स्वाभिमान? कुठं शेण खातोय तुमचा स्वाभिमान? कुठं पेंड खातोय तुमचा स्वाभिमान? एक मुख्यमंत्री गाव घेत आहे. एक उद्योग घेतो आहे अन् षंडासारखे बसला आहात तुम्ही? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
मी वारंवार सीमाभागात गेलो होतो. परत जाईल. मी XX नाही. शिवसेना XXची अवलाद नाही. शिंदे अजूनही कर्नाटकात का गेले नाही? त्यांच्याकडे सीमाभागाचा भार होता, ते कितीवेळा कर्नाटकात गेले? किती मंत्री बेळगाव, निपाणी आणि कारवार, खानापूर, भालकीला गेले?, असा सवाल त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात. आमच्या जखमेवर मीठ चोळतात. पण आम्ही लढू. प्राण गेला तरी बेहत्तर. कुणाचं सरकार आहे हे महत्त्वाचं नाही. आमचं सरकार असतं तरी आम्ही असाच आवाज उठवला असता, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात अत्यंत कमजोर दुर्बल सरकार अस्तित्वात आल्याने सरकारचे प्रमुख देवधर्म, तंत्रमंत्र, ज्योतिष यात अडकल्याने कर्नाटक आणि गुजरातमधून हल्ले होत आहेत. कोणी उद्योग पळवत आहेत तर कोणी जमिनी, गावं पळवत आहेत. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका नाहीये.
फक्त हे शक्य नाही, एकही गाव जाणार नाही, असं बोलून चालणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांची अशी हिंमत झाली नव्हती, असं ते म्हणाले.
आतून काही संगनमत सुरू आहे का? गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने महाराष्ट्रातील गावं तालुके आणि जिल्हे पळवायचे आणि महाराष्ट्र नकाशावरून खतम करायचा, असा काही कट आहे का? भाजपचे लोक शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत. आमचं मनोधैर्य खच्ची करायचं असं षडयंत्र पडद्यामागे रचलं जात आहे का? अशी भीती वाटते, असंही ते म्हणाले.
सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचं, सरकार दुर्बल असेल महाराष्ट्राचं, सरकार मिंधे असेल महाराष्ट्रात, पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर आलेलं संकट परतवून लावू. 106 हुतात्मे झाले.
अजून हुतात्मे देऊ. रक्त सांडवू. आम्हाला तुरुंगाची भीती आणि रक्त सांडण्याची भीती नाही. शिवसेनेने महाराष्ट्रासाठी 69 हुतात्मे दिले. बाळासाहेबांनी तुरुंगावास भोगला आहे. आम्हीही तुरुंगवास भोगू, असं त्यांनी सांगितलं.