नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : दैनिक सामनाची छायाचित्र काढणं हा नुसता छंद नाही तर ती हिंमत आहे. खोक्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. हिंमत खोक्यातून येत नसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही हिंमत कुठून आणणार? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. गिरगाव येथे आले असता राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. तसेच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकाही केली.
गिरगावात छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शिवसेना काय आहे? हे समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन पाहावं. शिवसेना कायम शिखरावर राहील आणि आहे. सर्व काही येतं जातं. पण शिवसेना नेहमी टोकावर राहील. गिरगाव हा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. इथून शिवसेना कधीच नष्ट होणार नाही. गिरगावात मी येतो, त्या गिरगावातून शिवसेना कधी नष्ट होणार नाही. आपलं धनुष्यबाण चिन्ह, नाव गेलं तरी कार्यक्रमाला गर्दी उलट वाढली आहे, असं संजय राऊत म्हणाले.
बाबरी आंदोलन सुरू असताना मुलायमसिंग यादवांची जांबोरी मैदानावर सभा होती. ही सभा शिवसेनेने उधळली होती. त्यावेळी खुर्च्या फेकल्या आणि त्यातील एक खुर्ची वरती उडाली. ती मुलायम सिंह यादव यांनी पाहिली आणि तो फोटो क्लिक झाला. ते मुलायम सिंह यादव यांनी लक्षात ठेवलं होतं. त्यांनी त्या फोटोच्या फोटोग्राफरचं कौतुक केलं होतं, असा किस्सा राऊत यांनी यावेळी सांगितला.
ईडीच्या कोठडीत असताना मी ज्या खोलीत होतो. तिथल्या खिडकीवर सगळे कॅमेरे अँगल लावून तासनतास उभे होते. या फोटोत सगळं दिसंतय. आम्ही तरुण होतो. आता म्हातारे झालो तरी तरुण आहोत. प्रदर्शनात राजभवनातले मोर पाहायला या फोटोत मिळतंय. कोश्यारींना मोर पाहता आले नाही. त्यांचं लक्ष नव्हतं. त्याचा सगळं लक्ष आमच्याकडे होतं, असा चिमटा त्यांनी काढला.
कोश्यारी राजभवनातील मोर बघत बसले असते तर सुखाने नांदले असते. राजभवनातील नाचणारे मोर कोश्यारींनी बघितले नाही. बघितले असते तर सुखाने नांदले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.