औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांच्याकडून ‘तो’ उल्लेख; संजय राऊत यांच्या कानपिचक्या

| Updated on: Jan 08, 2023 | 7:47 AM

औरंगजेबाचा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी केला. तो उगाच केलेला नाही. त्याला काही कारणं आहेत. औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातच्या दाहोद येथे झाला.

औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांच्याकडून तो उल्लेख; संजय राऊत यांच्या कानपिचक्या
औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांच्याकडून 'तो' उल्लेख
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता असं विधान केलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला. त्यामुळे दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पण्याच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र, बावनकुळे आणि आव्हाडसह भाजपला चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. दैनिक सामानातील रोखठोक सदरातून या दोन्ही नेत्यांचा राऊत यांनी समाचार घेतला आहे.

औरंगजेबाचा उल्लेख चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी केला. तो उगाच केलेला नाही. त्याला काही कारणं आहेत. औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातच्या दाहोद येथे झाला. जन्मावेळी औरंगजेबाचे पिताश्री गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी केला असावा, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या एका नेत्याने अफझल गुरुचा उल्लेख अफझल गुरुजी केला होता. तेव्हा राष्ट्रवादाच्या नावाने भाजपने धुमाकूळ घातला होता, याकडेही राऊत यांनी भाजपचं लक्ष वेधून चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबला औरंगजेबजी म्हटलं त्याचं काय? असा सवाल केला आहे.

यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही समाचार घेतला. औरंगजेब क्रूर नव्हता अशी नवी माहिती आव्हाड यांनी दिली. विष्णूच्या मंदिरासमोर संभाजी महाराजांना अटक केली.

पण औरंगजेबाने विष्णूचे मंदिर तोडले नाही, असं औरंगजेबाचं महात्म्य सांगतानाच आव्हाड यांनी सांगितलं. या एका पुराव्याने औरंगजेब क्रूर नसल्याचं व थोर मानवतावादी असल्याचं प्रमाणपत्रं आव्हाड यांनी दिलं, असा चिमटाही त्यांनी काढला.

यावेळी राऊत यांनी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर 26 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भाषणाचा राऊत यांनी दाखला दिला आहे. हा दाखला देताना औरंगजेब कसा क्रूर होता, हे मोदींनी कसे पटवून दिले याची माहितीही दिली. त्यानंतर राऊत यांनी भाजपला आणि बावनकुळे यांना सवाल केला आहे.

औरंगजेब क्रूर नव्हता असे कसे म्हणायचे? पुन्हा बावनकुळ्यांचे सन्माननीय औरंगजेबजी प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनाही न पटणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणारेच औरंगजेबजी यांचा सन्मान करू शकतात. महाराष्ट्रात तेच घडले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.