निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : बारसूमध्ये रिफायनरीचा विरोध करत असलेल्या आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. त्याचे तीव्र पडसाद उमटत असतानाच बारसूत लाठीमार झालाच नसल्याचं रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या रत्नागिरीतील जिल्हाधिकाऱ्याला हटवा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच हिंदुत्ववादी सरकार इस्लामिक ऑईल रिफायनरीसाठी मराठी माणसावर हल्ला करतंय, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे.
सौदी अरेबेयिताली एक कंपनी आहे. ऑयल रिफायनरी. हिंदुत्ववादी सरकार एका इस्लामिक ऑयल रिफानरीसाठी रत्नागिरीतील मराठी माणसावर हल्ले केले जात आहेत. एका इस्लामिक ऑयल रिफायनरीसाठी हे यांचं हिंदुत्व, अशी टीका संजय राऊत यांनी केली. लाठीचार्ज झालाच नाही असं जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना सांगतात. जिल्हाधिकारी खोटी माहिती देत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी बदला, अशी मागणी राऊत यांनी केली.
प्राण गेले तरी चालेल पण आम्ही जमिनी सोडणार नाही, असं स्थानिक लोक म्हणत आहेत. त्यामुळे सरकारने बारसूतील स्थानिकांशी बोललं पाहिजे. 70 टक्के ग्रामस्थ आमच्याबाजूने आहेत असं सरकार सांगतं. तुम्ही काय सर्व्हे केला आहे काय? ओपिनियन पोल केला का? की एक्झिट पोल केला? निवडणुकीत करतात तसा. कसला सर्व्हे केला आहे. लोक मरण्यसााठी उतरले आहेत. त्यांना अमानुषपणे मारलं जात आहे हे याचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
बारसूत बाहेरचे लोक होते असा आरोप सत्ताधारी करत आहेत. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. बाहेरचे म्हणजे कुठून आले? मॉरिशसमधून की सुदान मधून आलेत? की पाकिस्तानातून आले? बारसूतील लोकांची मुलं मुंबईत इतर ठिकाणी नोकरीला आहेत. 70 टक्के मुलं मुंबईत नोकरी करतात. ते गावाकडे गेले आहेत. इस्लामिक ऑईल रिफायनरीच्या दलालांना माहीत नसेल तर त्यांनी आमच्याकडून माहिती घ्यावी, असा चिमटा त्यांनी काढला.
परदेशात आहेत. तिथून ते वेगळा आदेश देतात. काही झालं तरी आंदोलन करा. बळाचा वापर करा. आंदोलकांना हुसकावून लावा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसमधून दिले आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.
आमच्यात बारसू बाबत मतमतांतरे नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही मतमतांतरे धुडकावून लावतो. बारसू प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी दिलेले आदेश हे सर्वोच्च असतात. आमदार आणि खासदार पक्षाच्या नेत्याच्या आदेशाला बांधील आहे. काही मतांतरे असतील तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करतो, असं राऊत म्हणाले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साप संबोधलं. त्यावरूनही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. साप हा काही वादाचा किंवा बदनामीचा विषय असू शकत नाही. कर्नाटकातील निवडणुकीचा विषय असू शकतो का? साप हे हिंदुत्वाचं प्रतिक आहे. आम्ही पूजा करतो. सापाची, नागाची. पुलवामा आणि काश्मीरवरून निवडणुका लढवा ना. माझी पंतप्रधांना विनंती आहे, असं ते म्हणाले.