निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यात जाणार आहेत. मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. त्यामुळे या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात पाऊल न ठेवू देण्याचा चंग पोलिसांनी बांधला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पोलिसांनाच ललकारले आहे. तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवताय? तुमची लायकी काय? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे.
असंख्य शिवसैनिकांची इच्छा होती म्हणून उद्धव ठाकरे येत आहेत. आम्ही जावू. पण उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रोखलं आहे. कालपासून पोलिसांनी मुंब्रा आणि ठाण्यात दहशत निर्माण केली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तडीपार करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. पोलिसांसमोरच पहाटेपर्यंत बॅनर्स फाडण्यात आले.
उद्धव ठाकरे यांना अडवायचं अशी पोलिसांची भूमिका आहे. आम्ही म्हणतो अडवा. अडवायची हिंमत असेल तर जरूर अडवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे. पोलिसांना फोन केला तरी पोलीस घटनास्थळी जात नाही. पोलीस कुणाच्या पे रोलवर आहात? पोलीस आयुक्तांनी सांगावं. तुम्ही कोणत्या गटाची चाकरी करत नाही. तुम्ही राज्याची चाकरी करत आहात, असंही ते म्हणाले.
आम्ही दिवाळी आनंदाने साजरी करत आहोत. तुम्हाला त्यात मिठाचा खडा टाकायचा का? तसं करायचं असेल तुम्ही जरूर अडवा. जे पोलीस आज आम्हाला अडवण्यासाठी हजारोच्या फौजफाट्याने कामाला लागले. ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवला जात असताना कुठे होते? पोलीस कुणाची गुलामगिरी करत आहेत? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्ही ज्यांची चाकरी करत आहात तो मालक 31 डिसेंबर रोजी सत्तेत राहणार नाही. राज्यात आणि केंद्रात बदल होणार आहे. 2024 मध्ये हा बदल होणार आहे. त्यामुळे जे शिवसैनिकांवर हात उचलत आहेत, शिवसैनिकांना नोटीसा बजावत आहेत त्यांनी स्वत:चं काय होईल हे पाहावं. मग ते प्रशासनातील लोक असतील त्याची पर्वा करणार नाही. अंगावर यायचं असेल तर या. तुमची लायकी काय? तुम्ही कोण आहात? तुम्ही उद्धव ठाकरेंना अडवताय?, असं ते म्हणाले.
पोलीस आयुक्तांना आव्हान आहे. आम्ही 4 वाजता आनंद नगर टोलनाक्यावर पोहोचत आहोत. हजारो शिवसैनिक स्वागत करतील. आम्ही मुंब्र्यात जाणार आहोत. मुंब्रा हा ठाण्याचा आणि महाराष्ट्राचा भाग आहे. कोण होते बुलडोजर फिरवणारे? कुणाच्या आदेशाने बुलडोजर फिरवला? लाजा वाटत नाही तुम्हाला? असा सवाल त्यांनी केला.