मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का? आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का? हे आमच्या डीएनएत नाही, असं सांगतानाच ती कृती भीष्म पितामहकडून होता कामा नये, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
काँग्रेस नेते नाना पटोले हे मातोश्रीवर आले. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. शरद पवार आणि अजित पवार यांची परवा बैठक झाली. त्यावर चर्चा झाली. या बैठकीवर नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. राज्यात वारंवार संभ्रमाचे वातावरण होत आहे. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतो. शरद पवार म्हणाले, अजितदादा पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचं वक्तव्य ऐकलं. नातीगोती सांभाळायची असतात, असं रोहित पवार म्हणाले. तुम्ही नातीगोती सांभाळायची तर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का मारामारी करायची?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
आम्ही उद्या एकनाथ शिंदे आणि इतरांसोबत चहा प्यायलो लागलो तर कसे होईल? आम्ही नेत्यांनी विरोधकांसोबत बसायचं, नातीगोती व्यवहार सांभाळायची, कार्यकर्त्यांनी विचारधारेसाठी भांडायचं हे ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही. ही लढाई देशासाठी आहे. महाभारताप्रमाणे स्वकीय असो की परकीय, लढाई ही लढाई असते. राज्याच्या अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे.
लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान भीष्मपितामहकडून होता कामा नये. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही लढणारे आहोत. नातीगोती प्रेम घरात. या लोकांनी आमच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करून कोणी आम्हाला आव्हान देत असेल तर ते आमचे नातेवाईक नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार सर्वांचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे नेते आहेत. इंडिया आघाडीचे नेते आहेत. ते मार्गदर्शक नेते आहेत. त्यांची संवादाची भूमिका असते. आम्हीही घेतो. पण ती कधी आणि केव्हा घ्यायची त्याचा राजकारणावर काय परिणाम होईल याचा आम्ही विचार करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा दोस्ताना होता. पण राजकारणात आपण वेगळे आहोत याची भावना ठेवूनच आम्ही त्यांच्याशी अंतर राखून आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणार नाही हे पाहिलं पाहिजे. कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरायचं, गोळ्या खायच्या, तुरुंगात जायचं आणि ज्यांच्यामुळे जे घडलं त्यांच्यासोबत चहा प्यायची हे आमच्या डीएनएमध्ये नाही. त्यांचा डीएनए वेगळा आहे, आमचा डीएनए वेगळा आहे. त्यामुळे ते काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.