निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : भाजपने मुंबईत आजपासून आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून ही आशीर्वाद यात्रा निघणार आहे. या यात्रेत शिंदे गटाचे नेतेही सामील होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा निघणार असल्याने या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, ही यात्रा निघण्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या यात्रेची खिल्ली उडवली आहे. भाजपवाले मुळापासून हादरले आहेत. त्यामुळेच ते यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रांनी कोणताही फरक पडणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या यात्रेचा काही उपयोग होणार नाही. आमच्या शिवगर्जना यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ते मुळापासून हादरले आहेत. कागदावर तुमच्याकडे चिन्ह आलं आणि पक्ष आला असला तरी जनमताचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्याबाजूने आहे. त्यामुळे तुमच्या यात्रा आणि पैशाच्या जोरावर लोकांना सामील करून घेणं याने काही फरक पडणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेवरही भाष्य केलं. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसैनिक या सभेसाठी कामाला लागला आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे, असं राऊत म्हणाले.
खेडमधील आजच्या सभेत काही कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे नाराज होण्याचं कारण नाही. खेड आणि आसपासची जागा जिंकण्यासाठी या कार्यकर्त्यांचा फायदा होणार आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील अनेक भागात उद्धव ठाकरे यांच्या सभा होतील. दुसरी सभा मालेगावला होणार आहे. मालेगावची तयारी सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ज्यांना निघून जायचं ते निघून गेले. आता काय? आता आहेत ते निष्ठावंत आहेत. ज्यांना पलायन करायचं होतं ते सर्व लोक निघून गेले. ते गेल्यावरही शिवसेना त्याच ताकदीने उभी आहे. काहीच परिणाम झाला नाही. कागदावर नाव आणि चिन्ह मिळालं. पण जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला जनता देण्याचा अधिकार नाही. कागदावरचं चिन्हं कागदावरच राहील, असंही ते म्हणाले.
देशातील नऊ प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या देशात तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे. विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. केंद्रापर्यंत ही बाब नेण्याचं ठरलं आहे. ते घटनात्मक पदावर आहे. त्यांच्या संमतीने होत असलं तरी विरोधी पक्षनेते म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यामुळे पत्र लिहिलं आहे. या पत्रावर शिवसेनेचीही सही आहे, असं राऊत यांनी सांगितलं.