मुंबई: राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha election) अवघे सात दिवस बाकी असताना या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अपक्ष आमदार आपल्याकडे कसे राहतील यासाठी शिवसेना (shivsena) आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच या निवडणुकीसाठी घोडेबाजार सुरू झाल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्वत: शिवसेना नेते संजय राऊत ((sanjay raut) यांनी त्यावरून विरोधकांना फटकारलं आहे. घोडेबाजार नावाचा शब्द आहे. तो वाईट पद्धतीने सुरू झाल्याचं दिसतंय. राजकारणात येणारा पैसा कुठून येतो? ही एक प्रकारे मनी लॉन्डरिंगची केस आहे. त्याचा तपास ईडीने करावा. आमदारांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. आमदार विकत घेण्यासाठी पैशाची प्रलोभन दाखवली जात आहेत. आमच्याकडून कोणत्याही आमदाराला प्रलोभनं दाखवली गेलेली नाहीत. ही प्रलोभनं दाखवणारे कोण आहेत? कोटी कोटी रुपयांचे आकडे मी ऐकत आहे. त्यामागचे सूत्रधार कोण आहेत? केंद्रीय तपास यंत्रणेने त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. फडणवीस हे मॅच्युअर्ड नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेते आहेत. आधीच राज्यातील राजकीय वातावरण गढूळ आणि प्रदूषित झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता वाटत आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी वातावरण चांगलं ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल त्यातून काही चांगला मार्ग निघत असेल तर चांगलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांना भेटून राज्याच्या प्रतिष्ठेसाठी काही चांगलं निघत असेल तर त्याचं स्वागत सर्वांनी केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यापार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी फडणवीस यांची भेट घेतली असून सातवा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या दोन तासात राज्यसभेचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
भाजपने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करावी. भाजपने सातवा उमेदवार मागे घेतल्यास आम्ही विधान परिषदेची पाचवी जागा भाजपला सोडू, असा प्रस्ताव महाविकास आघाडीने फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.