निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार नसल्याचं वृत्त आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस यांना चांगलेच चिमटे काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलेच आहेत. ते कधीही येतील. पण गुंतवणूक येणार नाही. पण शिंदे सरकारला गुंतवणुकीचं काहीच पडलं नाही, अशी टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा निव्वळ राजकीय असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
गुंतवणुकीबाबत या सरकारला काही घेणंदेणं नाही. पंतप्रधान येत आहे, त्यांचं स्वागत आहे. राज्याचे मंत्री दावोसला जात आहे. गुजरातचे नेतेही जात आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द केला पाहिजे. ते पालिका निवडणुकीसाठी येत आहे. पंतप्रधान चांगले आहेत. त्यांना विनंती करा. ते पुढची तारीख देतील. पण दावोसची तारीख मिळणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केवळ राजकारणाचं पडलं आहे. त्यांना गुंतवणुकीचं काही पडलं नाही. पंतप्रधान येत जात राहतील. ते आपलेच आहेत. पण गुंतवणुकीचं काय? असा सवाल करतानाच महापालिका निवडणुकीसाठी हा दौरा आहे. सर्व काही आम्ही करत आहोत, केंद्र सरकार करत आहे हे दाखवण्यासाठीच हा आटापिटा सुरू आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
पंतप्रधान एका दिवसासाठी, काही तासासाठी येत आहेत. पंतप्रधानांची तारीख बदलता आली असती. पण यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधानांचे राजकीय कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. महापालिका निवडणूक, शिवसेनेला त्रास देणं महत्त्वाचं आहे. त्यांना गुंतवणुकीचं काही पडलं नाही, असंही ते म्हणाले.
राऊत यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. मी जम्मूकाश्मीरच्या भूमीवर जाणार आहे, राहुल गांधींसोबत राहणार आहे. भारत जोडो यात्रेत जाणार आहे. 20 तारखेला जम्मू पासून या यात्रेत सामील होईल. राहुल गांधी 30 तारखेला काश्मीरला पोहोचणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
एक नेहरु-गांधी परिवारातील तरुण… ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. त्या कुटुंबातील मुलगा देशातील द्वेष दूर करण्यासाठी हजारो किलोमीटर चालत जात आहे. लोक त्यांचं स्वागत करत आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.