निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : देशभरातील 71 हजार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्यातून हे नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या या कृतीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. असे नियुक्ती पत्र देण्याचं काम आमचे नगरसेवक आणि शाखाप्रमुख करत असतात, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या रोजगार मेळाव्याची खिल्ली उडवली आहे. शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी झालेली आहे, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
आमच्याकडे ही कामे नगरसेवक करतात. अशा प्रकारची कामे शाखाप्रमुख आणि नगरसेवक हे रोजगार मेळावा भरवतात, रोजगार नियुक्तीची पत्र देतात. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच रोजगार देण्यासाठी केली होती. त्यांनी पत्रक वाटली नाही. हा शिवसैनिक आहे. मराठी माणूस आहे त्याला रोजगार मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही कायदा केला. आता चाललंय ते राजकारण आहे. पंतप्रधान रोजगार पत्रकं वाटायला लागले तर कठीण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनाही टोला लगावला. वंचित आघाडी आणि शिवसेनेत प्राथमिक चर्चा झाली आहे. आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन ते तीनवेळा वन टू वन चर्चा झाली आहे. या देशात संविधानाचं रक्षण व्हावं असं आंबेडकर यांचं म्हणणं आहे. संविधानाचं महत्त्व काय आहे हे सर्वात जास्त आंबेडकर यांना माहीत आहे. कारण ते त्या कुटुंबातील आहेत. त्या संविधानावरच हल्ला होत आहे. हुकूमशाही येत आहे.
याच एका भूमिकेतून शिवसेना आणि वंचितने एकत्र येऊन वंचिताचं रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, असं राऊत म्हणाले. पुढे काय होईल मला माहीत नाही. कारण त्या चर्चेत मी नाहीये. प्रकाश आंबेडकर यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तरीही ते म्हणतात मी संजय राऊतांना ओळखत नाही. त्यामुळे ज्या माणसाला ते ओळखतच नाही त्याने त्यावर कॉमेंट करणे योग्य नाही. मी शिवसेनेवर बोलेन, असा चिमटा त्यांनी राऊत यांना काढला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि महाराष्ट्राचा संबंध याचं वर्णन करता येणार नाही. महाराष्ट्राने देशाला युगपुरुष आणि वीर पुरुष दिलेत. शिवाजी महाराज, फुले आणि आंबेडकर यांचं स्थान सर्वोच्च आहे. या देशाचं संविधान त्यांनी लिहिलं. गोरगरीब दलितांना त्यांचे हक्क मिळवून दिले. देशाला ओळख निर्माण करून दिलं. ते संविधान वाचवण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा लढावा लागतोय हे बाबासाहेब आंबेडकरांचं दुर्देव आहे, असं ते म्हणाले.
या देशात फक्त संविधान बचाव, लोकशाही बचाव असे नारे ऐकायला येत आहेत. लोकशाहीचं दमन होत आहे. माणसांचे हक्क मारले जात आहेत. नागरी हक्क चिरडले जात आहेत. बाबासाहेबांनी जे दिलं ते सध्याचं सरकार हिरावून घेत आहे. उद्या सर्वांनी संविधान रक्षणाची शपथ घेतली पाहिजे. पक्षभेद विसरून एकत्र येऊ अशी शपथ घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.