रेड्याकडून दुधाची अपेक्षा…; संजय राऊत यांच्याकडून थेट राज्य सरकारला रेड्याची उपमा

| Updated on: Apr 02, 2023 | 10:52 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना काल जीवे मारण्याची धमकी आली होती. या धमकीनंतर धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, राऊत यांच्या सुरक्षेत अजूनही वाढ करण्यात आलेली नाही.

रेड्याकडून दुधाची अपेक्षा...; संजय राऊत यांच्याकडून थेट राज्य सरकारला रेड्याची उपमा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यांना दाढी वगैरे आवडत नव्हती. त्यामुळे शिंदे आता दाढी काढणार आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच मला अजूनही संरक्षण मिळालेलं नाही. सरकारकडून अपेक्षा नाही. रेड्याकडून दुधाची अपेक्षा काय करणार? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. तुम्हाला काल जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर तुमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे काय? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवली नाही. आम्ही मागितली नाही. सरकारविरोधकांच्या जीवाच्या बाबत अत्यंत बेफिकीर आहे. असायला हरकत नाही. कारण या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आधी सावरकर साहित्य वाचा

सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नसे. आता शिंदे दाढी कापणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं दाढी वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. व्यवस्थित राहायचं चकचकीत. मग ते मिंधे वगैरे आहेत ते गुळगुळीत दाढी करून सावरकरांच्या यात्रेत फिरणार आहेत का? हे लोकांसमोर प्रश्न आहेत. तुम्ही विचार यात्रा काढता. तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलं का? आधी मिंधे गटाने सावरकर साहित्याचं पारायण करावं. भाजपनेही सावरकर विचाराचं पारायण करावं. मग सावरकर यात्रा काढावी, असा टोला राऊत यांनी लगावला.

गोमाता मान्य नाही

सावरकरांनी या देशाला दिशा दिलेली आहे. वैज्ञानिकदृष्टीकोन दिला आहे. हा वैज्ञानिक दृष्टीकोन भाजप आणि मिंधे गट पाळणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवादाचा संदर्भ दिला. भाजप म्हणते, गाय ही गोमाता आहे. तर सावरकरांना ते मान्य नाही. गाय ही उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर गायीचं गोमांस खायला हरकत नाही. हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपला मान्य आहे का? अनेक विचार आहेत हिंदुत्वाच्या बाबतीत. सावरकरांनी शेंडी जानव्याचे हिंदूत्व स्वीकरलं नाही. आम्हीही शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाकारलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.