मुंबई : माझे हात पाय हलत नसताना एकनाथ शिंदे यांनी रात्रीच्या भेटीगाठी केल्या. सत्ता सांभाळण्याऐवजी मला सत्तेवरुन खाली खेचलं. असं उद्धव ठाकरे अमरावतीच्या मेळाव्यात म्हणालेत. त्यामुळं जनता धडा शिकवेल, असंही ठाकरे यांनी म्हंटलं. त्यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, तुम्हाला व्हिसी घ्यायला वेळ होता. तुम्हाला काँट्रॅक्टरला भेटायला वेळ होता. मात्र फक्त आमच्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे आता बोलणं बंद करा, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं.
सत्तेत सहभागी झाल्यावर नरहरी झिरवळ यांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय. शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार, असं झिरवळ म्हणालेत. त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, आमच्यापैकी कुणीही अपात्र होणार नाही. त्यामुळे झिरवळ यांनी सांभाळून बोललं पाहिजे, असा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला.
निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हं शिंदे गटाला देऊ शकते. पण शिवसेना नाव नाही. कारण शिवसेना नाव माझ्या आजोबा आणि वडिलांनी दिलंय. असं उद्धव ठाकरे म्हणालेत. या ठाकरे यांच्या वक्तव्याचाही संजय शिरसाट यांनी समाचार घेतला. शिवसेना ही काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.
अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेल्याचं समजतंय. तसे संकेत वीजदर सवलतीच्या जीआरवर अर्थ खात्याच्या समोर मा. मंत्री वित्त एवढंच लिहिलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ऊर्जा मंत्री असा उल्लेख आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले, असं काही नसतं. कुणाला कुठली खाती हे दोन दिवसांत कळेलच.