मुंबईतील कुर्ला येथील बस अपघाताची घटना ताजी असताना बेस्टचे चालक दारुचा नशेत सापडला होता. मागील आठवड्यातील या घटनांमुळे मुंबईत हादरे बसले होते. त्याचवेळी मंगळवारी धक्कादायक प्रकार घडला. शाळेची सहल घेऊन जाणारी बसमध्ये मद्यधुंद चालक निघाला. तो दारुच्या नशेत नागमोडी बस चालवू लागला. यामुळे 50 शाळकरी मुलांचा जीव टांगणीला लागला. वाहतूक पोलिसांना बस चालकाबाबत संशय आला. त्यांनी बसला थांबवल्यावर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत खाजगी बस चालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला. साकीनाका योगीराज श्रीकृष्ण विद्यालयमधून शाळेच्या मुलांना घेऊन खासगी बस गोराईमध्ये पिकनिकसाठी निघाली होती. या बसचे चालक आणि क्लीनर दारूचे नशेत होते. दारूच्या नशेत बस अंधेरी कुर्ला रोडवर नागमोडी चालवत होते. मंगळवारी सकाळी पोलीस कॉन्स्टेबल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल महाले कर्तव्यावर होते. त्यांना त्या बसबाबत संशय आला. त्यांनी ती थांबवली. त्यानंतर बस चालक आणि क्लीनर दोघे दारूचे नशेत मिळाले. या बसमध्ये योगीराज शाळेचे 50 मुले होते. पोलिसांनी वेळेवर बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही बस शाळेने गुप्ता ट्रॅव्हल्सकडून भाडयाने घेतली होती.
वाहतूक पोलिसांनी बस ताब्यात घेतल्यानंतर शाळेचे प्राचार्य आणि पालकांना बोलावले. त्यांना घटनेची माहिती देत मुलांना त्यांच्या ताब्यात दिले. बस चालक आणि बस क्लिनरवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे भविष्यातील अनुचित घटना टळल्याचे दिसते.
मुंबईत बेस्टसारख्या संस्थेतील चालक मद्याच्या नशेत आढळल्यानंतर मोठ्या प्रमाणवर टीका झाली होती. तो चालक कंत्राटी होता. त्याचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर आता खासगी बस चालक मद्याच्या नशेत निघाला. शाळेच्या सहलीसाठी बस देताना चांगला चालक देणे ट्रॅव्हल कंपनीची जबाबदारी होती. परंतु कंपनीने 50 मुलांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल पालक संतप्त झाले होते. त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले.