मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांचे सरकार आल्यानंतर, मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेना नेत्यांच्या जवळचे अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरु असल्याचे दिसते आहे. वरळी विधानसभा मतदार संघातील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्या मर्जीतील महापालिका जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांची बदली करण्यात आलेली आहे. शरद उघाडे यांची डी विभागाच्या सहायक आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर लगेचच जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली करण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापालिकेत किरण दिघावकर आणि शरद उघाडे हे आदित्य ठाकरे यांचे नीकटवर्तीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. आदित्य ठाकरे यांनी किरण दिघावकर आणि शरद उघाडे यांच्या माध्यमातून वरळी तसंच दादर-माहीम विधानसभा मतदार संघात अनेक विकास कामे आणि सौंदर्यीकरणच्या अनेक संकल्पना पूर्णत्वास आणल्या होत्या. मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपातील संघर्ष तीव्र झालेला असताना, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांची बदली करुन शिवसेनेला आणि विशेषता आदित्य ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न भाजपाने केलेला आहे.