Tv9 Exclusive | कांदिवलीच्या भाजी मंडईतला किळसवाणा VIDEO, घाण पाणी, भाज्या आणि बरंच काही

| Updated on: Jun 26, 2023 | 10:20 PM

मुंबईत पावसाला सुरुवात झालीय. पण या पावसात आपण आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने देखील याची काळजी घेतली पाहिजे. असं असताना मुंबईत कांदिवली येथील भाजी मंडईत एक अजबच प्रकार बघायला मिळाला आहे.

Tv9 Exclusive | कांदिवलीच्या भाजी मंडईतला किळसवाणा VIDEO, घाण पाणी, भाज्या आणि बरंच काही
Follow us on

मुंबई : मुंबईत तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झालीय. पाऊस शहरात चांगलाच बॅटिंग करतोय. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली बघायला मिळतेय. मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळालंय. त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यात याबाबतच्या होणारा त्रास नेहमीचाच असताना मुंबईकरांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार अतिशय किळसवाणा आहे. पावसाळ्यात वेगवेगळे साथीचे रोग होण्याची भीती असते. असं असताना मुंबईत भाजी मंडईत घाणेरड्या पाण्याजवळ भाजीपाला विकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

कांदिवलीमध्ये भाजी मंडईच्या मधोमध पावसाच्या घाणेरड्या पाण्यात भाजी विकल्याचा घृणास्पद व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा हिल्डा आंटी शाळेजवळील भाजी मंडईचा असा घृणास्पद व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही भाजी खाणे बंद कराल. दोन्ही बाजूंच्या भाजी मार्केटच्या मध्यभागी साचलेले हे घाण पाणी पावसाच्या पाण्याने तुंबलेल्या गटाराचे आहे.

हे सुद्धा वाचा

नाल्याजवळ एक शौचालय

नाल्याजवळ एक शौचालय देखील आहे. या पाण्यातून लोक शौचालयात जातात आणि नंतर याच पाण्यातून परत येतात. कधी-कधी शौचालय तुडुंब भरले की त्याचेही पाणी बाहेर पडून या भाजी मंडईच्या मधोमध साचते. या व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, घाणेरड्या पाण्याच्यावर भाजीचे दुकान लावले आहे आणि खाली काही पिशव्यांमध्ये भाजीपाला बांधून या घाणेरड्या पाण्यात ठेवल्या आहेत.

घाणेरड्या पाण्यात ठेवलेल्या या भाज्या लोकांना विकल्या जातील आणि त्या खाऊन लोक आजारी पडणार नाहीत तर दुसरं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. या भाजी मंडईवर आणि भाजी मंडईच्या मधोमध साचलेल्या घाण पाण्याकडे ना मुंबई महापालिका, ना स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे. त्यामुळे ही भाजी खाऊन लोक आजारी पडल्यावर जबाबदार कोण? असा महत्त्वाचा प्रश्न आहे.