Sharad Pawar Address Farmer: पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानी आहे काय?; शरद पवारांचा संतप्त सवाल

| Updated on: Jan 25, 2021 | 3:25 PM

शेतकरी आंदोलनात केवळ पंजाब, हरियाणाचे शेतकरी असल्याचं सांगण्यात येतं. पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का? पंजाबचा शेतकरी म्हणजे काय साधा आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. (Sharad Pawar Address Farmers Rally in mumbai)

Sharad Pawar Address Farmer: पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानी आहे काय?; शरद पवारांचा संतप्त सवाल
शरद पवार
Follow us on

मुंबई: शेतकरी आंदोलनात केवळ पंजाब, हरियाणाचे शेतकरी असल्याचं सांगण्यात येतं. पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का? पंजाबचा शेतकरी म्हणजे काय साधा आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पंजाब, हरियाणाचा शेतकरी गेल्या 60 दिवासांपासून आंदोलन करत आहे. पण केंद्र सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे. त्याचा निषेध करतोय, असे संतप्त उद्गारही त्यांनी काढेल. (Sharad Pawar Address Farmers Rally in mumbai)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी आझाद मैदानात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी नेते अजित नवले, शेकाप नेते जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सपा नेते अबू आजमी, अशोक ढवळे, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड उपस्थित होते. यावेळी पवारांच्या हस्ते शेतकरी आंदोलकांसाठी अन्न पुरवठा करणाऱ्या शीख बांधवांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर शरद पवारांनी आझाद मैदानातून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार तोफ डागली. ही लढाई केवळ शेतकऱ्यांची नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना शेतकऱ्यांबाबत कवडीचीही अस्था नाही. 60 दिवस झाले शेतकरी रस्त्यावर बसलाय. पण देशाच्या पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांची चौकशी केलीय का? असा सवाल पवार यांनी केला.

दिल्लीत आंदोलन करणारा शेतकरी हा पंजाब आणि हरियाणातील असल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबचा शेतकरी असला म्हणून काय झालं? पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे काय? असा संतप्त सवालही त्यांनी केला. स्वातंत्र्याच्या काळात याच पंजाबच्या शेतकऱ्याने जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण केलं. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यातही पंजाबच्या शेतकऱ्यांनी प्राण पणास लावले. अर्ध्या देशाला अन्न पुरवणारा हा बळीराजा आहे. पण सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे, अशी टीका त्यांनी केली.

तडजोड करणार नाही

या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा आणला. जो शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करतो, त्याला जनता उद्ध्वस्त केल्यासिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आधी कायदा रद्द करा आणि मग चर्चा करा. आमचीही चर्चेची तयारी आहे. पण शेतकऱ्यांचे हमी भावाशी संबंधित जे प्रश्न आहे, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ

मोर्चानंतर राज्यपालांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचं मला सांगण्यात आलं. पण मी महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही. या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण बळीराजाला भेटायला वेळ नाही, असा टोला पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांचं आंदोलन होतं हे राज्यपालांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी राजभवनात थांबायला हवं होतं. पण तेवढं धैर्य त्यांनी दाखवलं नाही. ते गोव्यात गेले. पण शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

आणखी उद्रेक वाढेल

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांवर टीका केली. गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू आहे. जनतेतही उद्रेक आहे. येणाऱ्या काळात हा उद्रेक अधिक वाढेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. आम्हीही शेतकरी कायद्याविरोधात राज्यपातळीवर आंदोलन करणार आहोत. तसेच राज्याचा कायदा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे. आज शेतकऱ्याविरोधात कायदा आणला, उद्या हे सरकार संविधानालाही हात घालेल, असा आरोपही त्यांनी केला. (Sharad Pawar Address Farmers Rally in mumbai)

लाल वादळ

आझाद मैदानात कालपासून हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. शनिवारी रात्री नाशिक येथून निघालेले सुमारे 20 हजार शेतकरी काल रविवारी दुपारी आझाद मैदानात धडकले. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी आणि सरकारविरोधी घोषणा देत हे लाल वादळ आझाद मैदानात आलं. केंद्राने कृषी कायदे रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन होत आहे. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीही हे शेतकरी आझाद मैदानात जमले आहेत. (Sharad Pawar Address Farmers Rally in mumbai)

 

संबंधित बातम्या:

कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं, काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?; अजितदादांनी फटकारलं

Farmers protest Azad maidan mumbai LIVE | राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही : शरद पवार

“नरेंद्र मोदीजी तुम्ही देश विकायला आला आहात”, अबू आझमींचं टीकास्त्र

(Sharad Pawar Address Farmers Rally in mumbai)