ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी दिल्लीत मोठी घडामोड घेतली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादीतील बडे नेते पण त्यांच्यासोबत होते. ही दोन नेते भेटल्याने बाहेर कार्यकर्ते भावनिक झाले होते. त्यांनी ही फूट संपवावी आणि दोन्ही गटांनी एकत्र यावे अशी भावनिक साद घातली. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे आनंददायी चित्र असल्याचे म्हटले आहे. तर संजय राऊत यांनी या भेटीवर खास प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येतील?
राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येतील अशा चर्चा अनेकदा झाल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी एकमेकांविरोधात विखारी प्रचार केल्याचे दिसत नाही. दोघे दिवाळी पाडव्याला एकत्र न आल्याने उलटसुलट चर्चा रंगली होती. पण आज अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाल्यानंतर सर्व चर्चा मागे पडल्या आणि दोन्ही गट एकत्र यावेत अशी भावनिक साद कार्यकर्त्यांनी घातली. नेते प्रकाश गजभिये यांनी अशाच भावना व्यक्त केल्या. आता हे दोन गट एकत्र येतील का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी यांनी दोन्ही नेते एकत्र दिसले हे आनंददायी चित्र असल्याची प्रतिक्रिया दिली. अजितदादा यांनी पक्षाचे कणखरपणे नेतृत्व करुन दाखवल्याचे ते सांगायला विसरले नाहीत. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रखर टीका केली. आव्हाड हे आगलावे असल्याचा टोला त्यांनी हाणला. तर संजय राऊत यांच्यावर सुद्धा त्यांनी तोंडसुख घेतले. यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा अजितदादांनी जपल्याचे भाष्य करण्यात आले.
संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया
तर खासदार संजय राऊत हे सुद्धा नवी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहचले. त्यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले. राष्ट्रवादीत फुट पाडल्यानंतर याच नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्याचे ते म्हणाले.