महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सत्ता गेली. त्यानंतरत गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहे. महाविकास आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले जात आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले होते. विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाले, असे पवार यांनी म्हटले होते. या सर्व घटनांचा पार्श्वभूमीवर शनिवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली. परंतु ही चर्चा परभणी, बीडसंदर्भात झाल्याचे पवार यांनी म्हटले.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. पुण्यात साहित्य परिषदेच्या कार्यक्रमास शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी येथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बीड आणि परभणी येथील परिस्थितीवर चर्चा झाली. हा भाग शांत झाली पाहिजे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली.
संकट येतात मात्र तुम्ही जागृत असाल हवे. संकटाच्या काळात लोक सहकार्य आणि साथ देत असतात. गेले काही दिवस अस्वस्थ वातावरण महाराष्ट्रात दिसत आहे. बीड, परभणी कस शांत करता येईल, हे पहिले पाहिजे. मी इथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. अशांत महाराष्ट्र असे चित्र राज्यात होवू द्यायचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
बीड आणि परभणी शांत होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. बीड जिल्ह्यात समाजात दुफळी दिसत आहे. त्यामुळे सरकारचा प्रयत्न आहे की हा भाग शांत झाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हा सरकारचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत बोलताना सांगितले.