बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांनी ही भेट घेतल्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाकडे 3 आमदारांचे संख्याबळ आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपने 1 उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली आहे. बहुजन विकास आघाडीने याआधीच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. पण यावेळी हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईत ही भेट झाली आहे. या भेटीमागे आगामी विधान परिषद निवडणुकीसाठीचं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार गटाने विधान परिषद निवडणुकीत शेकाप नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. जयंत पाटील हे शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार आहेत.
शरद पवार गटाकडील मते महत्त्वाची आहेत. खरंतर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. पण भाजपने एक जास्त उमेदवार दिल्याने या निवडणुकीत आता चुरस बघायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपल्याकडे मतं खेचण्यासाठी प्रयत्न करेल. शेकाप नेते जयंत पाटील यांना शरद पवार गटाच्या आमदारांची मते जातील. पण तरीही त्यांना बऱ्याच मतांची आवश्यकता आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे 3 मतांची ताकद आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी जयंत पाटील यांना मतदान केलं तर त्यांना जिंकून येण्यास मदत होऊ शकते.
हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांचे जुने मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे या मैत्रीचा या निवडणुकीत शरद पवार गटाला फायदा होतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांची बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर हितेंद्र ठाकूर हे शेकापचे जयंत पाटील यांना मतदान करु शकतात, अशी चर्चा आहे.